छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली मालिका म्हणजे 'ठिपक्यांची रांगोळी'. कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत शरद पोंक्षे , अतुल तोडणकर,लीना भागवत अशी तगडी स्टारकास्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांच्या यादीत आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्री एन्ट्री होणार आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही अपूर्वाची भूमिका साकारत असून लवकरच मालिकेत तिच्या आईची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे तिच्या आईची भूमिका एक दिग्गज अभिनेत्री साकारणार आहे. ही अभिनेत्री केवळ एक कलाकारच नाही तर उत्तम लेखिकादेखील आहे.
अभिनेत्री,लेखिका मुग्धा गोडबोले लवकरच ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत ती अपूर्वाच्या आईची म्हणजेच अंजली वर्तक यांची भूमिका साकारणार आहे."ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे, त्यामुळे या मालिकेचा भाग होताना अतिशय आनंद होत आहे, माझ्या या पात्राच्या येण्याने मालिकेत खळबळ उडणार आहे हे नक्कीचं!!," असं मुग्धा म्हणाली.
दरम्यान, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, राजन ताम्हाणे, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज या मालिकेत झळकत आहे.