कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिका (Ashok Ma.Ma. Serial) प्रेक्षकांना भावनिक आणि तणावपूर्ण प्रवासावर घेऊन चालली आहे. गणपती विसर्जनानंतर सुरू झालेला निलिमाच्या शोधाचा धडपडीतला प्रवास आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. घरातील सर्वांच्या मदतीने निलिमाचा ठावठिकाणा लागतो आणि एक क्षणभरासाठी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. परंतु, जेव्हा अशोक मा.मा. नीलिमेला भेटायला जातात तेव्हा तिचं थंड, कठोर वागणं पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. रक्ताचं नातं असूनही नीलिमा मामांच्या डोळ्यात डोळे न पाहता दार बंद करते. तिच्या आयुष्यात नक्की काय घडतंय, ती इतकी बदलली कशी, हे सर्वांसाठीच मोठं कोडं बनतं.
याचवेळी अशोक मा.मांना काही लोकांकडून निलिमाच्या बिकट परिस्थितीबद्दल माहिती मिळते. घरात उभ्या असलेल्या संकटांमध्ये आता निलिमाचा नवरा अनिशच्या वागण्यामुळे आणखी गोंधळ वाढतो. त्याने लोकांकडून घेतलेले पैसे वसूल करण्यासाठी थेट अशोक मामांच्या घरी धडक दिली जाते. परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच नीलिमा मामांशी उद्धटपणे वागते. असे वागण्यामागचे कारण काय असेल? दुसरीकडे भैरवी तिच्या आयुष्याचं एक वेगळंच स्वप्न जगते आहे. तिच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय आहे. पण वैयक्तिक नात्यांमधील कटुता आणि अनिशसोबतचे सततचे वाद तिचं आयुष्य गुंतागुंत करत आहेत. अनिशच्या चुकीच्या वागणुकीमुळे भैरवीच्या हातातून एक मोठी ऑर्डर निसटणार का? आणि हे प्रकरण त्यांच्या नात्यावर कोणता परिणाम करणार?
एका बाजूला नीलिमाच्या मनातील गुपित आणि तिच्या नात्यांचा ताण, तर दुसऱ्या बाजूला भैरवी- अनिशमधील वाढत चाललेली दरी या पार्श्वभूमीवर अशोक मामांच्या मनात एकच प्रश्न घुमतो नीलिमाच्या अश्या वागण्यामागचे कारण काय? मामा ही नात्यातील गुंतागुंत कशी सोडवणार? जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागेल.