Join us

"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य

By कोमल खांबे | Updated: August 22, 2025 15:31 IST

अमृताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने टीव्ही इंडस्ट्रीची दुसरी बाजू दाखवली आहे. या व्हिडीओतून अमृताने टीव्ही सिरीयलच्या कास्टिंगबाबत सांगितलं आहे. 

अमृता देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'फ्रेशर्स', 'तुमचं आमचं सेम असतं', 'मी तुझीत रे' अशा मालिकांमध्ये ती दिसली. त्यानंतर ती 'बिग बॉस मराठी'मध्येही सहभागी झाली होती. अमृताने काही सिनेमेही केले. नाटकांमध्येही ती काम करत आहे. 'लक्ष्मी निवास' या मालिकेतही ती छोट्याशा भूमिकेत दिसली होती. पण, त्याव्यतिरिक्त ती छोट्या पडद्यावर फारशी कुठे दिसली नाही. यामागचं कारण आता समोर आलं आहे. अमृताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने टीव्ही इंडस्ट्रीची दुसरी बाजू दाखवली आहे. या व्हिडीओतून अमृताने टीव्ही सिरीयलच्या कास्टिंगबाबत सांगितलं आहे. 

या व्हिडीओत ती म्हणते, "असं म्हणतात की कलाकाराच्या आयुष्यात ऑडिशन हा प्रकार दात घासण्याइतका डेली असतो. पण माझ्या आयुष्यात डेन्टल फ्लॉस करण्यासारखा तो झालेला आहे... क्वचित, प्रासंगिक आणि वेदनादायी. याची कारणं मी चार कॅटेगरीमध्ये विभागली आहे. पहिली कॅटेगरी- जसं मलायका अरोरा जीमला चालली की तिच्या पाठीमागे पापाराझी धावते. तसंच ज्या क्षणी मला कळतं की एखाद्या चॅनेलवर नवीन प्रोजेक्ट येणार आहे. त्यानंतर लगेचच असं कळतं की या प्रोजेक्टसाठी अगोदरच कास्टिंग झालेलं आहे. कुणाचं?? तर माजी लीडचं... म्हणजे एक तर दुसऱ्या चॅनेलवर त्यांनी नुकतंच मुख्य भूमिकेत काम केलंय किंवा त्याच चॅनेलवर आधी ज्यांनी लीडमध्ये काम केलंय त्यांचं... कारण त्यांना तेच हवेत". 

"कॅटेगरी २- स्त्रीचं वय वाढतं... वय वाढलं की ती मोठी दिसू लागते. २०व्या दिवशी ती जशी दिसते तशीच ती २२व्या वर्षी कोवळी दिसू शकत नाही. तिचा अभिनय भलेही ग्रो होत असेल पण वयाचं काय? ताज्या कोवळीच्या भेंडीची सर तिला कशी येणार? लीड हिरोईन २५-३० वर्षातली असूच शकत नाही. कॅटेगरी ३- चाळीशीतली मुलगी. या चाळीशीतल्या हिरोईनचं लग्न झालेलं असतं आणि तिच्या नवऱ्याचं अफेअर असतं. किंवा तिच्या लग्नाला उशीर झालेला असतो. किंवा ती घटस्फोटित असते. मी आता चातक पक्षासारखी चाळीशीची वाट बघतेय. म्हणजे मग मला काम मिळेल", असं अमृताने म्हटलं आहे. 

पुढे अमृता म्हणते, "कॅटेगरी ४- मॉडर्न ड्रेसमधली व्हिलन. कारण पंजाबी ड्रेसमधल्या मुली व्हिलन असतात कुठे... मॉर्डन ड्रेसमधलीच जी व्हिलन असते तिला त्या हिरोचं प्रेम हवं असतं. तिला त्या हिरोच्या आईने आणलेलं असतं. आणि तिला घंटा काही सेल्फ रिस्पेक्ट नसतो. यात मी किती परफेक्ट फिट होते.  आता तुम्ही म्हणाल की मी सिनेमा का नाही करत? सिनेमात मला कास्ट करायला लागले तर मग प्रिमियरला गेस्ट म्हणून कोण जाणार? सोशल मीडियावर पोस्ट कोण टाकणार? हा व्हिडीओ जर मी टाकला तर कुठलेच चॅनेलवाले मला काम नाही देणार. मला असं फिलिंग येतंय की मी एक क्लासी एअरपोर्ट लाऊंज झालेले आहे. जिथे लोकांना थांबायचं नसतं कारण त्याचं डेस्टिनेशन वेगळं असतं. पण, असो आज मी एअरपोर्ट लाऊंज असली म्हणून काय झालं...कल आसमान भी मेरा इंतजार करेगा".  

टॅग्स :अमृता देशमुखटिव्ही कलाकार