'ये है मोहोब्बते' फेम टीव्ही अभिनेता अली गोनी (Aly Goni) 'बिग बॉस १४' मुळे दिसला होता. याच शोमध्ये त्याची ओळख जास्मिन भसीनशी (Jasmin Bhasin) झाली. दोघं प्रेमात पडले. तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. बिग बॉसनंतर अली 'लाफ्टर शेफ' शोमध्येही दिसला. नुकतंच अलीने एका मुलाखतीत एक खुलासा केला. मुस्लिम असल्यामुळे मुंबईत घर शोधायला अडचणी आल्याचं तो म्हणाला.
InControversial ला दिलेल्या मुलाखतीत अली गोनीने त्याच्या स्ट्रगविषयी माहिती दिली. तो म्हणाला,"काश्मिरी म्हणून माझ्यासोबत कधीच या इंडस्ट्रीत भेदभाव झाला नाही. मात्र घर शोधायची वेळ आली तेव्हा मात्र अडचणी आल्या. आजही या अडचणींना सामोरं जावं लागतं. जास्मिन आणि मी मुंबईत घर शोधत होत मात्र अनेकांनी आम्हाला घर द्यायला नकार दिला, 'आम्ही मुस्लिमांना घर देत नाही' अशी उत्तरं मिळाली. यातले अनेक जास्त वयाचे लोक होते. मी टीव्हीवरचा चेहरा असूनही मला या अडचणीला सामोरं जावं लागलं."
इंडस्ट्रीत ओळख मिळवण्यासाठी आलेल्या संघर्षाबद्दल अली म्हणाला, "स्ट्रगल सगळीकडेच आहे. इथेही आहे. शोबीजमध्ये आम्हाला अनेकदा निराशा पत्करावी लागते. ऑडिशनपासून ते कास्टिंगपर्यंत आव्हानंच आव्हानं असतात. आजकाल सोशल मीडियावर रील्स बनवून लोक प्रसिद्धीझोतात येतात. कास्टिंग डायरेक्टर्सने एखाद्या प्रोजेक्टसाठी आपल्याला रिजेक्ट केलं तर स्वत:च्याच टॅलेंटवर शंका येते. पण आताच्या तरुणांना ऑडिशन काय असते माहितही नसेल. मला इंडस्ट्रीतील अनेक लोकांकडून पाठिंबा मिळाला. विशेषत: एकता कपूरने मला बालाजीच्या अनेक शोमध्ये संधी दिली. मात्र हा स्ट्रगल कधीही न संपणारा आहे."