Akshay Kelkar Wedding Video: मराठी मालिका, रिअॅलिटी शोमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे अक्षय केळकर सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. अक्षय केळकरने त्याची गर्लफ्रेंड साधनाशी काल ९ मे रोजी लग्नगाठ बांधली. अक्षय आणि साधना यांच्या लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या लग्नातील प्रेम, प्रतीक्षा आणि वचनबद्धता प्रतिबिंबित करणारा एक भावूक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अक्षय आणि साधनाचा लग्नसोहळा हा जितका पारंपरिक तितकाच भावनिक होता. या लग्नातील एक व्हिडीओ सध्या समोर आलाय. ज्यामध्ये साधनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतानाच्या क्षणी अक्षयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागल्याचं पाहायला मिळालं. हे अश्रू दुःखाचे नाही तर आनंदाचे होते. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
अक्षय केळकर आणि साधना हे जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. १० वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये दोघांनी अनेक चढ उतार पाहिले. आयुष्यातील प्रत्येक क्षण एकमेकांची साथ दिली. एवढ्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर काल दोघांनी 'सात जन्मांचं वचन' घेत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अक्षय आणि साधनाची गोष्ट अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे. खऱ्या प्रेमाला वेळ लागतो, पण जेव्हा ते पूर्ण होतं, तेव्हा त्याहून सुंदर काहीच नसतं.
अक्षय केळकर आणि साधना यांची लव्ह स्टोरी थोडीशी फिल्मी आहे. अक्षय आणि रमाची एका नाटकात ओळख झाली होती. तिथे तिने गायलेलं गाणं अक्षयला प्रचंड आवडलं. त्याने नंतर तिच्याशी संपर्क केला आणि दोघांचं बोलणं वाढलं. तिला प्रपोज केल्यावर तिने दोन वेळा नकार दिला. नकार दिल्यानंतरही ते दोघे मित्र म्हणून सोबत राहिले आणि एक दिवस साधनाने स्वत:हून अक्षयला प्रपोज केलं. तेथूनचं दोघांच्या नात्याची गोड सुरुवात झाली. अक्षयने 'बिग बॉस मराठी ४'मध्येही गर्लफ्रेंडचा उल्लेख 'रमा'म्हणून केला होता. त्याने तिचं नाव गुलदस्त्यात ठेवतं, प्रेम व्यक्त केलं होतं.