JyotiChandekarDeath: स्टार प्रवाह वाहिनीच्या 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिकेतील पूर्णा आजीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांचं निधन झालं. त्या ६९ वर्षांच्या होत्या. गेल्या ३-४ दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची दुपारी ४च्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. त्यातील तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर सध्या ठरलं तर मग मालिकेत काम करत होत्या. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या पुण्याला गेल्या होत्या. तिथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी ४ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. गेल्या वर्षी मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्या सेटवर आजारी पडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झालं होतं. तेव्हा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर त्या पुन्हा मालिकेत परतल्या होत्या.
वर्कफ्रंट
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर या एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. गेली ५० वर्षांपेक्षा अधिक काळ त्या चित्रपटसृष्टीत सक्रिय होत्या. 'गुरू', 'ढोलकी', 'तिचा उंबरठा', 'पाऊलवाट', 'सलाम', 'सांजपर्व' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील 'तू सौभाग्यवती हो', 'छत्रीवाली' या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकीने एका चित्रपटात एकत्र काम केलं आणि तो चित्रपट मराठीतील अजरामर चित्रपटांपैकी एक ठरला. मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात त्या दोघींनी सिंधुताईंच्या आयुष्यातील दोन विविध पर्वातील भूमिका साकारल्या. या दोघींचं त्यांच्या भूमिकांसाठी खूप कौतुक झालं होतं. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. ज्योती चांदेकर यांना मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.