Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांच्यासाठी काहीपण'; घरातील मदतनीस महिलांसोबत श्वेता शिंदेने केलं फोटोशूट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 11:02 IST

Shweta shinde: श्वेता शिंदेने खास पद्धतीने सेलिब्रेट केला महिला दिन; घरातील मदतनीस महिलांसोबत केलं फोटोशूट

मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून कायम श्वेता शिंदेकडे (Shweta Shinde) पाहिलं जातं. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती लोकप्रिय निर्मातीदेखील आहे. लागिर झालं जी, देवमाणूस अशा अनेक गाजलेल्या मालिकांची तिने निर्मिती केली आहे. श्वेता तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत येत असते. श्वेता कायम नवनवीन गोष्ट करुन समाजापुढे आदर्श निर्माण करत असते. यावेळीदेखील तिने असंच काहीसं केलं आहे.

नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्वेताने तिच्या घरी काम करायला येणाऱ्या महिलांसाठी असं काही केलं ज्यामुळे सर्व स्तरांमधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अलिकडेच श्वेताने 'मटा सन्मान २०२४'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने महिला दिनाचं सेलिब्रेशन कसं केलं ते सांगितलं.

कसा साजरा केला श्वेताने महिला दिन?

यंदा मी महिला दिनानिमित्त माझ्यासाठी माझ्या घरात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्यांना घेऊन फोटोशूट केलं. दरवेळेस असं होतं की मी छान साडी नेसून, दागिने घालून, मेकअप करुन घराबाहेर पडायचे. त्यामुळे कायम त्या मला म्हणायच्या, मॅडम तुम्ही आज खूप छान दिसताय. पण मला असं कायम वाटायचं की एक दिवस हा त्यांच्यासाठी असा असायला हवा जिथे त्या तयार होतील. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी मेकअप, हेअर आणि फोटोग्राफर बोलावून एक प्रोफेशनल फोटोशूट केलं, असं श्वेता शिंदे म्हणाल्या.

पुढे ती सांगते, मी एक संपूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवला. त्याच इथे राणी आहेत अशी भावना त्यांच्यासाठी निर्माण केली. तो आनंद बघताना मला खूप आनंद मिळाला, मी खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केल्यासारखं वाटलं.'

दरम्यान, श्वेता शिंदे सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते. यापूर्वीही तिने अनेक उपक्रमातून समाजातील काही गरजूंना, अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. 

टॅग्स :श्वेता शिंदेटेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकारजागतिक महिला दिन