Thoda Tuz Ani Thoda Maza : छोट्या पडद्यावरील मालिका या वर्षानुवर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. या मालिका जणू प्रेक्षकांच्या दैनंदिन अविभाज्य घटक बनून जातात. अशीच एक लोकप्रिय मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. मात्र, ही मालिका बंद होणार असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. या मालिकेचं नाव 'थोडं तुझं आणि थोडं माझं' आहे. अवघ्या वर्षाभरानंतर थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अशातच या मालिकेतील अभिनेत्रीने शेअर पोस्टने सगळ्यांना भावुक केलं आहे.
शिवानी सुर्वे आणि समीर परांजपेची मुख्य भूमिका असलेली 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेचा पहिला भाग १७ जून २०२४ रोजी प्रसारित झाला. मालिकेतील तेजस-मानसीची जोडी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली होती. आता ही लोकप्रिय ठरलेली मालिका ऑफ एअर होणार आहे. दरम्यान, या मालिकेत प्रभूंची लेक म्हणजेच आभाची भूमिका अभिनेत्री सखी गुंडेने साकारली होती. ही मालिका संपणार असल्याने सखी देखील भावुक झाली आहे. सोशल मीडियावर सुंदर शब्दांत पोस्ट लिहून अभिनेत्रीने त्यामध्ये म्हटलंय, उद्या आमच्या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होतोय त्या निमित्ताने... ही माझी पहिली मालिका आणि पहिल्याच मालिकेत मिळालेली छान भूमिका आणि एवढी सुंदर टीम. या प्रोजेक्टच्या निमित्ताने कस लावून काम करणारी आणि कॅमेर्यामागे तेवढीच धमाल करणारी माणसं मी पाहिली. मी एक-दीड महिना उशिरा जाॅईन होऊनसुद्धा यांनी कधीच मला वेगळं वाटू दिलं नाही. एवढी मजा, एवढी मस्ती, माझे इतके लाड, एवढं प्रेम पुन्हा कुठल्या सेटवर मिळेल की नाही माहित नाही, पण एखादं चांगलं काम नक्कीच माझी वाट पाहत असेल."
यापुढे अभिनेत्रीने म्हटलंय, "कुछ पाने के लिए कुछ खोना जरुर पडता है। या कामासाठी मी अपर्णामॅम आणि अतुलसरांची कायम ऋणी राहीन. अर्थात हा पूर्णविराम नाही, या माणसांशी पुढे अनेक प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने किंवा सहज भेटीगाठी होत राहतील, पण त्यात 'थोडं तुझं आणि थोडं माझं' कायम खास राहील!", अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.