काही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात एका बातमीची चांगलीच चर्चा झाली. ती म्हणजे, अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर लग्न करणार, याची. सोहम आणि पूजा एकमेकांच्या प्रेमात असून लवकरच एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकणार, असं बोललं जाऊ लागलं. परंतु दोघांनी मात्र या विषयावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अखेर पूजाने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर करुन नकळतपणे या विषयावर मौन सोडलंय. पूजाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय?
पूजाने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
पूजा-सोहम यांचा एकमेकांसोबत एकही फोटो नाही इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही त्यांनी एकमेकांबद्दल कधी काही पोस्ट केली नाही. तरीही ते दोघे लग्न करणार, अशा बातम्या व्हायरल झाल्या. पूजा यामुळे चांगलीच नाराज झालेली दिसते. त्यामुळेच तिने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये ती लिहिते की, "खाजगी व्यक्तींनाच सोशल मीडियावर कशी पोस्ट करायची हे माहितच असतं. तरीही आपण काहीच केलं नाही, आपल्याला काहीच माहित नाही असं दाखवत ते आयुष्य जगतात." अशा शब्दांमध्ये पूजाने पोस्ट करुन तिची नाराजी व्यक्ती केली आहे.
सोहम - पूजा लग्न करणार असल्याची चर्चा?
सोहम बांदेकर हा अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा. सोहम त्यांच्या निर्मिती संस्थेचं काम बघतो. 'ठरलं तर मग' या स्टार प्रवाहवरील सध्या गाजलेल्या मालिकेच्या निर्मितीची जबाबदारी सोहम सांभाळत आहे. तर दुसरीकडे पूजा बिरारी ही सुद्धा अभिनेत्री आहे. 'राजश्री मराठी'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, सोहम आणि पूजा लवकरच लग्न करणार असल्याची बातमी पसरली. पूजा सध्या स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मंजिरी या मुख्य भूमिकेत दिसत आहे. पूजाने शेअर केलेल्या पोस्टनुसार ती आणि सोहम कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाहीत, हेच स्पष्ट होतंय.