नवरात्रीनिमित्त अनेक अभिनेत्री विविध लूक परिधान करत आहेत. आज नवरात्रीचा पहिला रंग पांढरा आहे. त्यानिमित्त अभिनेत्रींनी विविध संकल्पनांच्या माध्यमातून फोटोशूट केलं आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अभिनेत्रीने नवरात्रीनिमित्त अनोखी कल्पना केली आहे. या अभिनेत्रीने 'आई कुठे काय करते' मालिकेत काम केलंय. या अभिनेत्रीचं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.अभिनेत्रीने केला लता मंगेशकरांचा लूक
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अश्विनी महांगडे. अश्विनीने सोशल मीडियावर खास फोटोशूट केलंय. लता मंगेशकर यांच्यासारखी पांढरी साडी नेसून निरागस डोळे आणि बोलके हावभाव यांच्या मदतीने अश्विनीने हे फोटोशूट केलंय. अश्विनीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 'आजचा रंग - पांढरादेवी - देवी शैल्यपुत्री' अशा शब्दात अश्विनीने कॅप्शन लिहून त्याखाली लता मंगेशकर यांच्या कार्याचा गौरव केलाय. 'खूप छान ताई', 'शुभ्रा' अशा कमेंट करत लोकांनी अश्विनीच्या फोटोशूटची प्रशंसा केली आहे.
अश्विनी महांगडे दरवर्षी नवरात्रीनिमित्त विविध संकल्पनांच्या साहाय्याने खास फोटोशूट करताना दिसते. गेल्यावर्षीही अश्विनीने केलेल्या अनोख्या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दिली होती. यंदाही अश्विनीने नवरात्रीनिमित्त फोटोशूट करुन जो शुभारंभ केलाय, त्याला चाहत्यांनी उचलून धरलंय. त्यामुळे आता अश्विनी पुढील दिवसात अजून कोणते लूक पोस्ट करणार, याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.