संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षण सध्या नाटक, सिनेमा, मालिका अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहे. संकर्षणचं बोलणं आणि त्याने लिहिलेल्या कविता ऐकत राहाव्याश्या वाटतात. संकर्षणने नुकत्याच एका मुलाखतीत आईविषयी सांगितलं आहे. आईच्या जेवणाचं पावित्र्य या विषयावर बोलताना संकर्षण भावुक झालेला दिसला. संकर्षण जे काही बोलला ते वाचून तुमचेही डोळ्यांसमोर तुमची आई उभी राहील आणि तुमचेही डोळे पाणावतली.
संकर्षण आईविषयी काय म्हणाला?
संकर्षण कऱ्हाडे आईविषयी काय म्हणाला, "जर मला व्हेंटिलेटर लावला असेल आणि कोणी येऊन सांगितलं की आईने गरम स्वयंपाक केलाय तर मी दहा मिनिटं तरी उठून जेवून पुन्हा व्हेंटिलेटरवरती जाईल. ते पावित्र्यच येणे नाही. माझी आई स्वयंपाक करताना जी दिसते, ते पावित्र्यच येणे नाही. तिने रोजच्या जेवणातील हिरव्या टमाट्याची चटणी, गरम पापुद्रा निघालेली पोळी, गवारीच्या शेंगाची भाजी, साधं वरण त्याला कडीपत्त्याचीही फोडणी नाही. आणि भात असा जर वाढला तर मी रोज रडतो जेवताना."
"रोज रडतो! हे आत्ता तू फोन लावून माझ्या बाबांना विचार किंवा कोणालाही माझ्या बायकोला विचार की, रोज डोळ्यात पाणी येतं माझ्या की हे काय आहे. हे परब्रम्ह आहे. अनसंग हिरो आपण म्हणतो ना तसं ते आहे ते. त्या स्वयंपाकाविषयी बोललं जात नाही फार, पण ते दैवी आहे! प्रत्येकालाच आपली आई प्रिय असते. मी आईला म्हणतो, तू तेव्हा जाशील तेव्हा स्वर्गातही तुला देवांच्याकडे स्वयंपाक घरातच म्हणतील तुम्ही स्वर्गात इथं काम करा आणि आम्हाला खाऊ घाला." अशाप्रकारे संकर्षणने त्याच्या आईविषयी वक्तव्य केलं. हे सांगताना संकर्षणही भावुक झाला होता.