Join us

"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

By देवेंद्र जाधव | Updated: May 15, 2025 12:58 IST

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा' मालिकेच्या शूटिंगवेळेस भेटायला आलेल्या चाहत्याचा विलक्षण अनुभव शेअर केला आहे

सागर देशमुख (sagar deshmukh) हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. सागरने मराठीसोबत हिंदी इंडस्ट्रीतही स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सागरने काही वर्षांपूर्वी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा' मालिकेत अभिनय केला होता. सागरने या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारली होती. याच मालिकेदरम्यान असंख्य चाहते सागरला भेटायचे यायचे. तशाच एका चाहत्याचा विलक्षण अनुभव सागरने एका मुलाखतीत शेअर केला आहे.

साताऱ्यातून एक चाहता भेटायला आला अन्...

अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सागर देशमुख म्हणाला की, "लोक मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभुषेत पाहून ज्या पद्धतीने प्रतिक्रिया द्यायचे ते भयानक होतं. मी स्वतः हादरुन गेलो होतो. साताऱ्यामधला एक माणूस मला भेटायला होता. मी तेव्हा शूट करत होतो. त्यावेळी लोकांना कळायचं की, मला भेटायला आलेत म्हणजे ४०-४५ मिनिटं शूटिंग थांबणार आहे. तो माणूस त्याच्या कुटुंबासकट भेटायला आला."

"मला बघून तो माणूस थरथर कापून रडायलाच लागला. एक ५५ वर्षाचा माणूस आपल्यासमोर धाय मोकलून रडतोय, तर त्याला शांत कसं करावं हे मला कळत नव्हतं. मी त्यांना म्हणालो, 'साहेब, मी ते नाही. मी फक्त ती भूमिका करतोय. मी फक्त त्याचे विचार पोहोचवण्यासाठी एक निमित्तमात्र ठरतोय.'", अशा शब्दात सागरने हा किस्सा शेअर केला. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा' ही मालिका स्टार प्रवाहवर चांगलीच गाजली. या मालिकेत सागर देशमुख, शिवानी रांगोळे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

टॅग्स :सागर देशमुखडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीटेलिव्हिजनस्टार प्रवाहशिवानी रांगोळे