कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी ही मालिका घराघरात पाहिली जाते. मालिकेच्या अत्यंत गूढ आणि उत्कंठावर्धक कथेमुळे सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. अशातच आता मालिकेत देवीने घेतलेले बालरूप, तिच्या दैवी लीलांचे सूक्ष्म संकेत, सटवाईसमोरचा भविष्यलेखनाचा पेच, आणि महिषासुराचा उन्मत्त अहंकार या सर्वांची एकसंध वीण प्रेक्षकांना भावत आहे. याच कथानकाला एक नवे वळण मिळणार आहे, कारण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आई तुळजाभवानीचे बालरूप जगदंबा.
पाळण्यात झुलणाऱ्या एका निरागस बाळाला चिंताग्रस्त गंगाई जोजवत आहे. तिला चिंता आहे बाळाच्या बारशाची कारण कोणाही गावकरी स्त्रिया या बारशाला आलेल्या नाहीत.या नाजूक भावनिक क्षणात आकाशात दिव्य तेजात न्हालेल्या पाच देवी प्रकट होतात. त्या हळूहळू साध्या स्त्री वेशात गंगाईसमोर अवतरतात. गंगाई भावविवश होऊन त्यांच्यासमोर नम्र विनंती करते “माझ्या बाळाचं बारसं तुमच्या हातून होऊ देत”. त्या पाच देवी एकमेकींकडे पाहत स्मित करतात आणि एकसाथ बाळाच्या कानात म्हणतात “कुर्र्र्र्र... जगदंबा!”.
हातात गुंफलेल्या कवड्या, निरागस हास्य आणि पाणीदार टपोरे डोळे, कपाळावर असलेला तेजस्वी मळवट म्हणजेच लहानगी जगदंबा तिचे हे लोभस रूप प्रेक्षकांना नक्कीच भावेल. तिच्या पावलांनी भूमीला स्पर्श होताच भूमी सोनेरी चमकते. बालरूपातली ही देवी म्हणजेच भविष्यात महिषासुराचा नाश करणारी शक्ती आहे. देवीचा हा बालावतार म्हणजे निव्वळ निरागसता नसून, त्यामागे आहे प्रचंड शक्ती आणि नियतीने ठरवलेलं एक महत्त्वाचं युगप्रवर्तक कार्य आहे.
सध्या मालिकेत देवीने महिषासुराचा अंत करण्यासाठी बालरूप धारण केले आहे. मात्र, या लीलेचं कोडं सटवाईसुद्धा सोडवू शकलेली नाही. तुळजाचं मानवी भविष्य लिहिण्याचं दायित्व तिच्यावर आहे, पण हे भविष्य तितकंसं सोपं नाही. दुसरीकडे, महिषासुराला हे संकेत स्पष्ट समजले आहे, पण त्याचा गर्व आणि उन्मत्तवृत्ती हे मान्य करायला तयार नाही. “भविष्य मी घडवतो” या गर्वात तो तुळजाला मिळवण्याच्या ध्येयाने झपाटलेला आहे. ही मालिका कलर्स मराठीवर सोम. ते शनि. रात्री ९ वाजता बघायला मिळेल.