'आई कुठे काय करते' ही टीव्हीवरील गाजलेली मालिका. या मालिकेला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम दिलं. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनेही प्रसिद्धी मिळवली. या मालिकेमुळेच मधुराणी प्रेक्षकांच्या घरात आणि मनात पोहोचली. मधुराणीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. आता मधुराणीने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.
मधुराणीने ह्युंडाई कंपनीची क्रिटा गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मधुराणीने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे. व्हिडीओतून अभिनेत्रीने नव्या गाडीची झलकही दाखवली आहे. "आनंद म्हणजे नवीन कार..." असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मधुराणीच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. मधुराणीने खरेदी केलेल्या या कारची किंमत १७ ते २० लाख रुपयांच्या घरात आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली मधुराणी मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. काही नाटक आणि सिनेमांमध्येही ती झळकली आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच मधुराणी एक उत्तम लेखिकाही आहे.