दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचं मोठ्या थाटात आगमन झालं आहे. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. यंदाही कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. काही कलाकार दरवर्षी स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती घडवतात. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्यानेही यंदा शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती घडवली आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत यशची भूमिका साकारून अभिनेता अभिषेक देशमुख घराघरात पोहोचला. अभिषेक सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतो. शाडूच्या मातीपासून मूर्ती घडवण्याचा व्हिडीओही अभिषेकने शेअर केला आहे. यामध्ये तो स्वत:च्या हातानी बाप्पाची मूर्ती बनवताना दिसत आहे. "बाप्पा in the making..शाडूची मूर्ती!! बाप्पा मोरया", असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, अभिषेकने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. पसंत आहे मुलगी या मालिकेत तो मुख्य भूमिकेत होता. तर आई कुठे काय करते या मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या अभिषेक वजनदार या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याने 'फोमो', 'सनी', '१५ ऑगस्ट', 'होम स्वीट होम', 'आयच्या गावात मराठीत बोल' या सिनेमांमध्येही काम केलं आहे.