Join us
Daily Top 2Weekly Top 5

या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:17 IST

मालिकेचे निर्माते असित मोदी आणि जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्यामध्ये मालिकेच्या सेटवर भांडण झाल्याच्या चर्चा होत्या. या भांडणामध्ये दिलीप जोशी यांनी असित मोदींची कॉलर पकडून मालिका सोडत असल्याची धमकी दिल्याचंही सांगितलं जात होतं. या संपूर्ण प्रकरणावर आता दिलीप जोशी यांनी मौन सोडत त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत असलेली 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेचे निर्माते असित मोदी आणि जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्यामध्ये मालिकेच्या सेटवर भांडण झाल्याच्या चर्चा होत्या. या भांडणामध्ये दिलीप जोशी यांनी असित मोदींची कॉलर पकडून मालिका सोडत असल्याची धमकी दिल्याचंही सांगितलं जात होतं. या संपूर्ण प्रकरणावर आता दिलीप जोशी यांनी मौन सोडत त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यामध्ये सुट्ट्यांवरून भांडण झाल्याचं म्हटलं गेलं होतं. दिलीप जोशी यांना सुट्टी हवी म्हणून ते असित मोदी यांच्याकडे गेले होते. तेव्हाच त्यांच्यात भांडण झाल्याचं म्हटलं आहे. मात्र दिलीप जोशींनी ही अफवा असल्याचं म्हटलं आहे. 

काय म्हणाले दिलीप जोशी? 

ज्या अफवा पसरत आहेत, त्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे. असित भाई आणि माझ्याबद्दल मीडियामध्ये पसरलेल्या गोष्टी या खोट्या आहेत. आणि हे पाहून मला अतोनात दु:ख होत आहे. तारक मेहता का उलटा चष्मा हा शो माझ्यासाठी आणि चाहत्यांसाठी खूप काही आहे. त्यामुळेच जेव्हा अशा अफवा पसरवल्या जातात तेव्हा फक्त मलाच नाही तर प्रेक्षकांनाही दु:ख होतं. 

 

इतके वर्ष केवळ आनंद दिलेल्या गोष्टीबाबत नकारात्मकता पसरवली जाणं हे निराशाजनक आहे. जेव्हा जेव्हा अशा अफवा पसरतात. तेव्हा आम्हाला स्पष्टीकरण देत हे खरं नसल्याचं सांगावं लागतं. हे खूप निराशाजनक आहे. कारण, हे फक्त आमच्यापुरतं सीमित नसून यामुळे चाहत्यांनाही दु:ख होतं. 

मी हा शो सोडत आहे, अशा अफवा देखील पसरल्या होत्या. त्यादेखील खोट्या आहेत. काही आठवड्यांनी असित भाई आणि शोला बदनाम करण्यासाठी काही अफवा पसरवल्या जात आहेत, असं वाटतंय. अशा गोष्टी सारख्या होताना पाहणं हे निराशाजनक आहे. पण, मला कधी कधी असं वाटतं की मालिका यशस्वीरित्या सुरू असल्यामुळे काही लोकांना त्रास होत आहे. 

या गोष्टी कोण पसरवत आहे ते मला माहीत नाही. पण, मी हे सांगू इच्छितो की मी इथेच आहे. आणि मी रोज त्याच प्रेमाने आणि ध्येयाने काम करत आहे. मी कुठेही जात नाहीये. बऱ्याच काळापासून मी या सुंदर प्रवासाचा एक भाग आहे. आणि पुढेही मला याचा भाग व्हायला आवडेल. 

ही मालिका चांगली करण्यासाठी आम्ही सर्वच आमच्या कमिटमेंट पूर्ण करतो. पण, मीडियाने अशा बातम्या देण्याआधी सत्य जाणून घ्यावं. हा शो सकारात्मकता आणि आनंद देतो, त्यावर लक्ष केंद्रित करूया. आम्हाला नेहमी सपोर्ट केल्याबद्दल चाहत्यांचे आभार ...

दिलीप जोशी गेली १४ वर्ष 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. अनेक वर्ष मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या दिलीप जोशींना या शोमुळेच लोकप्रियता मिळाली. जेठालालने त्यांना घराघरात पोहोचवलं. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार