Join us

T20 World Cup : ‘मौकाsss मौकाsss’ जाहिरातीनं ‘या’ भिडूचं आयुष्यचं बदललं, हा अभिनेता कोण आहे माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 15:28 IST

T20 World Cup : मौका- मौका या एका जाहिरातीनं त्याचं संपूर्ण आयुष्यच पालटून टाकलं.

ठळक मुद्देमुळचा दिल्लीचा असलेल्या विशालचं या जाहिरातीनं आयुष्यचं बदलून टाकलं. स्टार प्लसच्या सनम रे, सांसे अशा अनेक शोमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली.

येत्या रविवारी म्हणजे 24 ऑक्टोबरला ‘मौका मौका’ म्हणत सर्वजण टीव्हीसमोर बसणार. कारण अर्थातच सगळ्यांना ठाऊक आहे. टी-20 विश्वचषक 2021 सुरू झालाय आणि येत्या रविवार टीम इंडिया पाकिस्तानी क्रिकेट संघाशी  भिडणार आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचणारच. टीव्हीपासून सोशल मीडियापर्यंत या सामन्याची जाहिरातबाजी सुरू झालीये. टीव्ही आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘मौका-मौका’ जाहिरात  झळकू लागली आहे. पण या जाहिरातील पाकिस्तानी क्रिकेट फॅनची भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे, हे तुम्हाला माहितीये का? 

तुम्ही ‘मौका-मौका’ ही जाहिरात बघितली असेल तर त्यात पाकिस्तानी चाहत्याच्या रूपात एक चेहरा वारंवार दिसतो. तो फटाके घेऊन फिरतो. पाकिस्तान जिंकला की, फटाक्यांचा बार उडवायचा त्याचा इरादा असतो. पण यावेळी त्याचं स्वप्नं स्वप्नं राहतं, अशी ही जाहिरात आहे. तर तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, जाहिरातील हा पाकिस्तानी चाहता मुळात एक भारतीय अभिनेता आहे. त्याचं नाव विशाल मल्होत्रा. मोठ्या पगाराची नोकरी सोडून सध्या विशाल अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत नशीब आजमावतोय.विशाल म्हणतो त्याप्रमाणे, ‘मौका मौका’ ही जाहिरात मिळाली आणि त्याचं नशीब पालटलं.  अ‍ॅक्टिंग क्षेत्रात येण्यापूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला विशाल एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता. पण डोक्यात अ‍ॅक्टिंगचा किडा वळवळतं होता. मग काय, नोकरी सोडून 2012 मध्ये तो मुंबईत आला. ‘रागिनी एमएमएस 2’मध्ये त्याला एक लहानशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण स्ट्रगल संपलेला नव्हता. अशात त्याला या जाहिरातीची ऑफर आली. या जाहिरातीसाठी पाकिस्तानी चेह-याचा अभिनेता मेकर्सला हवा होता. या एकाच निकषावर या जाहिरातीसाठी विशाल मल्होत्राची निवड झाली.अवघ्या दोन दिवसांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि पाहता पाहता तिला अमाप लोकप्रियता मिळाली. इतकी ज्याची कुणी अपेक्षाही केली नसावी.  सर्वत्र विशालचाच चेहरा दिसू लागला.जाहिरात गाजतेय म्हटल्यावर स्टार स्पोर्ट्सनं विशालसोबत एक करारही केला. या जाहिरातीमुळं विशाल पाकिस्तानमध्येही प्रसिद्ध झाला. एक दिवस आपणही फटाके फोडू असे मेसेजही त्याला येऊ लागले. मुळचा दिल्लीचा असलेल्या विशालचं या जाहिरातीनं आयुष्यचं बदलून टाकलं. स्टार प्लसच्या सनम रे, सांसे अशा अनेक शोमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली.  मुंबईत घर घेण्याचं त्याचं स्वप्न साकार झालं. लवकरच तो एका चित्रपटात आणि वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. आधी क्रिकेटमध्ये विशालला फार रस नव्हता. पण ही जाहिरात केल्यानंतर तो क्रिकेटचा प्रत्येक सामना पाहतो. भारत-पाक मॅचसाठी तर चक्क सुट्टी घेतो. रविवारी भारत-पाक सामना आहे म्हटल्यावर त्यानं आधीच सुट्टी मंजूर करून घेतलीये, हे सांगायला नकोच.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२टेलिव्हिजन