Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुष्मिता सेनने दिली तब्येतीबाबत माहिती, म्हणाली, 'हृदयविकाराच्या धक्क्यानंतर आता मी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 16:51 IST

इतकंच नाही तर 'आर्या 3' कधी येणार यावरही सुष्मिताने खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला (Sushmita Sen) काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चाहते काळजीत पडले होते. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर सुष्मिताने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. तब्येत सुधारल्यानंतर तिने पुन्हा कामालाही सुरुवात केली. लवकरच ती 'आर्या 3' मध्ये दिसणार आहे. तर आता तिची तब्येत कशी आहे याबद्दल तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांशी संवाद साधला.

सुष्मिता नुकतीच पॅरिस आणि स्वित्झर्लंडच्या ट्रिपवरुन परतली आहे. तिने दोन्ही मुलींसोबत तिथे सुट्ट्यांचा आनंद घेतला. तसंच वेळ काढून तिने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तिच्या तब्येतीविषयी एका चाहत्याने विचारलं असता ती म्हणाली, 'माझी तब्येत आता अगदी व्यवस्थित आहे. मी आता स्वत:ची काळजी घेत आहे आणि भरपूर खात आहे.'

इतकंच नाही तर 'आर्या 3' कधी येणार यावरही सुष्मिताने खुलासा केला. ती म्हणाली, 'मी स्वत:च आर्या 3 च्या रिलीजची प्रतिक्षा करत आहे. मला वाटतंय हा सिझन खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. यामध्ये बरंच काही नवीन बघायला मिळेल. मी तुम्हाला सीरिजविषयी सांगण्यास खूप उत्सुक आहे. पण त्याआधी आम्हाला चर्चा करायची आहे.'

'आर्या 3' शिवाय सुष्मिता सेन 'ताली' या वेबसिरीजमध्येही दिसणार आहे. ट्रांसजेंडर गौरी सावंतची भूमिका ती साकारत आहे. तिचा सिरीजमधला पहिला लुक नुकताच समोर आला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

टॅग्स :सुश्मिता सेनबॉलिवूडवेबसीरिजआरोग्य