Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुपरस्टार विकी कौशलने 'या' मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा, म्हणाला- "पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:05 IST

विकी कौशलने सध्या रंगभूमीवर सुरु असलेल्या एका मराठी नाटकाला मराठी भाषेतूनच शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र विकीच्या व्हिडीओची चर्चा आहे

विकी कौशल हा बॉलिवूडचा सुपरस्टार. २०२५ मध्ये 'छावा' सिनेमातून विकीने बॉलिवूडमध्ये हे वर्ष चांगलंच गाजवलं आहे. 'छावा'मध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. विकी कौशल मराठी चांगलं बोलताना दिसतो. याशिवाय तो अनेक मराठी सिनेमे आणि नाटकांनाही वेळोवेळी शुभेच्छा देत असतो. अशातच विकीने एका मराठी नाटकाला हाऊसफुल्ल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे. जाणून घ्या कोणतं आहे हे मराठी नाटक?विकीने या मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा

विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विकी म्हणतो, ''नमस्कार! मी विकी कौशल. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो. तुमचं काम,  तुमची मेहनत आणि तुमचा प्रयत्न की, आपल्या महाराजांचा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा, ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत, हीच शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय!'' अशा पद्धतीने विकीने 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाला मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या आहेत.

'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' नाटकाविषयी

'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं. मधल्या काळात नाटकाचे प्रयोग बंद झाले होते. परंतु काही दिवसांपूर्वी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. या नाटकाचे लेखन राजकुमार तांगडे यांनी केले आहे, तर दिग्दर्शन कैलाश वाघमारे, संभाजी तांगडे यांनी केले आहे. नाटकाची संकल्पना लोकशाहीर संभाजी भगत यांची असून त्यांनीच नाटकातील गाणी आणि संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. या नाटकात कैलाश वाघमारे, संभाजी तांगडे, मीनाक्षी राठोड, राजकुमार तांगडे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नाटकाचे अनेक कलाकार शेतीत काम करणारे असून त्यांनीच हे नाटक रंगभूमीवर आणलं आहे.

टॅग्स :विकी कौशलनाटकमराठी अभिनेतामराठी चित्रपट