Mohanlal, Dadasaheb Phalke Award: भारतीय चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी दक्षिण भारतातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना जाहीर करण्यात आला आहे. अलिकडेच, भारत सरकारने २०२३च्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली होती. त्यानंतर मोहनलाल यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. मोहनलाल यांच्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार ही घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो. मोहनलाल यांना २३ सप्टेंबर २०२५ रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार, भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात येत आहे की मोहनलाल यांना २०२३चा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मोहनलाल यांचा चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो! भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रतिष्ठित योगदानाबद्दल या महान अशा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्याचा सन्मान केला जात आहे. त्यांची अतुलनीय साधना, बहुमुखी प्रतिभा आणि अथक परिश्रम यांनी भारतीय चित्रपट इतिहासात एक मानक स्थापित केले आहे. त्यासाठी २३ सप्टेंबर २०२५ रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अभिनंदन
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहनलाल यांचे पुरस्कार जाहीर झाल्याबाबत सोशल मीडियावरून अभिनंदन केले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाऊंट एक्सवर लिहिले की, मोहनलाल जी यांचे अभिनंदन. केरळच्या आदिपोलीपासून ते जगभरातील प्रेक्षकांपर्यंत, त्यांच्या कार्याने आपली संस्कृती छान दाखवली आहे आणि आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. त्यांचा वारसा भारताच्या सर्जनशील भावनेला प्रेरणा देत राहील.
मोहनलाल यांचे ४०० हून अधिक चित्रपट
मोहनलालचा चित्रपट प्रवास लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे . त्यांनी केवळ मल्याळमच नाही तर तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मोहनलाल यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि नऊ केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्रीसारखे सन्मान देखील दिले आहेत.