साऊथ सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. तमिळ दिग्दर्शक विक्रम सुगुमरण यांचं आज(२ जून) निधन झालं आहे. ते ४७ वर्षांचे होते. बसमध्येच त्यांना कार्डियक अरेस्ट आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. विक्रम सुगुमरण यांच्या निधनावर साऊथ सिनेसृष्टीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.
इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रम सुगुमरण हे मदुरईवरुन बसने चेन्नईला प्रवास करत होते. एका निर्मात्याला नवीन स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी ते मदुराईला गेले होते. मदुराईवरुन परतताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. लगेचच विक्रम यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विक्रम सुगुमरण यांनी १९९९ साली असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. अनेक प्रोजेक्टचं त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. Madha Yaanai Kootam सिनेमातून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकलं होतं. त्यांनी दिग्दर्शित केलेला Raavana Kottam हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. Therum Porum या प्रोजेक्टवर ते काम करत होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि मुले असा परिवार आहे.