Allu Arjun: अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जवळपास ३ वर्षानंतर सिनेमाचा दुसरा भाग येत आहे. २०२१ मध्ये बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. या चित्रपटाचं कथानक त्यातील संगीत शिवाय पुष्पाची स्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यानंतर या सिनेमाच्या सीक्वलची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. येत्या ५ डिसेंबरला या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. अलिकडे बिहारच्या पटनामध्ये या सिनेमाचा ट्रेलर लाँच पार पडला. परंतु ट्रेलर लॉन्चिंगदरम्यान अल्लू अर्जुनने चाहत्यांची माफी मागावी लागली. यामागे नेमकं काय कारण होतं. जाणून घ्या.
'पुष्पा-'२ सिनेमाचा ट्रेलर १७ नोव्हेंबरच्या दिवशी पाटना येथे प्रदर्शित करण्यात आला. त्यादरम्यान अल्लू अर्जुनने स्टेजवर डॅशिंग लूकमध्ये एन्ट्री घेतली. 'पुष्पा-२' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्याने चाहत्यांसोबत हिंदीमध्ये संवाद साधला. अल्लू अर्जुनला स्पष्टपणे हिंदी बोलता येत नाही हे सगळ्यांनाच ठावुक आहे. पण, चाहत्यांसोबत हिंदीमध्ये बातचीत करताना अभिनेता म्हणाला, "पुष्पा कभी झुकता नहीं हैं लेकिन आज आपके प्यार के सामने झुकेगा."
पुढे अल्लू अर्जुन म्हणाला, "मला हिंदी स्पष्ट बोलता येत नाही. यासाठी मी तुमची माफी मागतो, माझ्याकडून काही चुकलं तर क्षमा करा" अशा शब्दांत अभिनेत्याने चाहत्यांसमोर भावना व्यक्त केल्या. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही साधेपणाने वागणं हा अल्लू अर्जुनचा गुण चाहत्यांना भावला. त्यामुळे त्याचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. या इव्हेंट दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील त्याच्यासोबत स्टेजवर उपस्थित होती.