Join us

अभिनयानंतर आता समांथाचं पुढचं पाऊल! सुरू केलं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 10:50 IST

समांथाने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत समांथाने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. 

समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. मोठा चाहता वर्ग असलेली समांथा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील माहितीही समांथा पोस्टद्वारे चाहत्यांना शेअर करत असते. अभिनयात जम बसवल्यानंतर आता समांथाने पुढचं पाऊल टाकलं आहे. समांथाने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत समांथाने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. 

समांथाने स्वत:ची निर्मिती संस्था (प्रोडक्शन हाऊस) सुरू केलं आहे. ट्रालाला मुव्हिंग पिक्चर्स असं समांथाच्या प्रोडक्शम हाऊसचं नाव असून तिने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. "माझ्या निर्मिती संस्थेची घोषणा करताना आनंद होत आहे.ट्रालाला मुव्हिंग पिक्चर्स...नवीन पिढीचे विचार आणि भावना असलेला कटेंट मांडणं हे ट्रालाला  मुव्हिंग पिक्चर्सचं मुख्य उद्दिष्ट असेल. खऱ्या, अर्थपूर्ण आणि युनिव्हर्सल कथा सांगणाऱ्या दिग्दर्शकांसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध असेल," असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी समांथाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सध्या समांथाने अभिनयापासून दूर आहे. तिने काही वेळ ब्रेक घेतला असल्याचं सांगितलं होतं. मायटोसिस या आजारावर समांथा सध्या उपचार घेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या खुशी आणि शांकुतलम या चित्रपटांत ती झळकली होती. समांथा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. तिने नागा चैतन्यशी २०१७मध्ये विवाह केला होता. परंतु, २०२१मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीसिनेमासेलिब्रिटी