दाक्षिणात्य अभिनेत्री नित्या मेनन (Nithya Menen) नेहमीच तिच्या बिंधास्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या ती आगामी चित्रपट 'कधलिक्का नेरामिलई' सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने फिल्म इंडस्ट्रीतील तिचा एक अनुभव सांगितला. तिने अेकदा इंडस्ट्रीतील लोकं निर्दयी असतात असं विधान केलं आहे. मात्र यावेळी तिला एक वेगळा अनुभव आला जो तिने शेअर केला आहे.
अनेकदा कलाकारांना त्यांच्या तब्येतीची पर्वा न करता परफॉर्मन्स द्यावा लागतो. अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. सिनेमा विकटनला दिलेल्या मुलाखतीत नित्या मेनन म्हणाली, "फिल्म इंडस्ट्री काही प्रमाणात निर्दयी असते. तुम्ही आजारी असू द्या किंवा अडचणीत असू द्या, पण सेटवर येऊन परफॉर्मन्स द्यावाच लागतो. आम्हाला आता याची सवय झाली आहे. काहीही झालं तरी संघर्ष कोणालाच चुकलेला नाही."
२०२० साली आलेल्या 'साइको' सिनेमात नित्याने फिल्ममेकर मैसस्किन यांच्यासोबत काम केलं. त्यांच्यासोबतचा तिचा अनुभव अगदी वेगळा होता. ती म्हणाली, "शूटिंगच्या पहिल्या दिवशीच मला पीरिअड्स आले आणि मला खूप त्रास होत होता. मी पहिल्यांदाच एका पुरुष दिग्दर्शकाला फोन करुन पाळीचा त्रास होत असल्याचं सांगितलं. यानंतर त्यांनी मला 'पहिला दिवस आहे का?' असं विचारलं. तेव्हा मला वाटलं की हे किती समजून घेतात. त्यांनी मला आराम करायचा सल्ला दिला आणि बरं वाटलं की ये असं सांगितलं. त्यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे मी खूप प्रभावित झाले होते. इतरांपेक्षा त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने समजून घेतलं. मैसस्किन म्हणाले की त्यांची आई, पत्नी आणि मुली आहेत. ज्यामुळे त्यांना या गोष्टीची जाणीव आहे."