Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुमची सुरक्षा हेच माझ्यासाठी...", 'केजीएफ' स्टार यशचं चाहत्यांना भावनिक आवाहन; शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:39 IST

'केजीएफ' स्टार, साउथ अभिनेता यश (Yash) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'रामायण'मुळे चर्चेत आहे.

Yash : 'केजीएफ' स्टार, साउथ अभिनेता यश (Yash) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'रामायण'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, येत्या ८ जानेवारीच्या दिवशी अभिनेत्याचा वाढदिवस असल्याने त्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आवाहन केल्याचं पाहायला मिळतंय. वाढदिवसाच्या ८ दिवस आधीच सोशल मीडियाद्वारे खास पत्र शेअर केलं आहे.

दरम्यान, २०२४ च्या जानेवारी महिन्यात अभिनेता यशच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांकडून २५ फूट उंचीचा कटआऊट लावताना अपघात घडला. त्यावेळी तीन जणांचा मृत्यू  झाला. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अभिनेत्याने चाहत्यांसाठी खास नोट शेअर केली आहे. सोशल मीडियावर यशने पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय, "नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून विचार करण्याची, वचन देण्याची एक नव्या मार्ग तयार करण्याची वेळ आली आहे. तुम्ही सर्वानीच गेल्या वर्षाभरात मला जे काही प्रेम दिलं आहे, त्यामुळे मी भारावून गेलो आहे.  परंतु त्यासोबत काही वाईट घटना देखील घडल्या."

पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "आता वेळ आली आहे की आपल्याला प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलावी लागेल. विशेष करून माझ्या वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रेम दाखवण्याचा अर्थ म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी करणं किंवा जल्लोष करणं असा होत नाही. माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे तुमची सुरक्षा असेल. तुम्ही तुमचं ध्येय साध्य करत आहात आणि आनंदात आहात हे माझ्यासाठी महत्वाचं आहे."

याशिवाय यशने चाहत्यांना तो वाढदिवशी शूटमध्ये व्यस्त असेल असंही सांगितलं. त्यावेळी तो म्हणाला, "मी माझ्या वाढदिवशी शहरात नसेन, शूटिंगमध्ये बिझी असेन. तरीसुद्धा तुमचे शुभाशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचतील. ते मला नेहमीच नवी उर्जा आणि प्रेरणा देत राहतील." 

वर्कफ्रंट

साउथ सुपरस्टार यशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता त्याच्या आगामी 'टॉक्सिक' (Toxic)  सिनेमात दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर यशच्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. 'केजीएफ' सिनेमानंतर यशच्या या सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यशने शूटला सुरुवातही केली आहे. 

टॅग्स :यशसेलिब्रिटीसोशल मीडिया