Pushpa 2: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा'चा सीक्वल असलेल्या 'पुष्पा २'साठी प्रेक्षकांना तब्बल ३ वर्ष वाट पाहावी लागली. 'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ला देखील प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच सिनेमाचे शोज हाऊसफूल झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच अल्लू अर्जुनच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत.
सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. या एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर केवळ 'पुष्पा २'चा बोलबाला पाहायला मिळाला. 'पुष्पा २'चं एका आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या एका आठवड्यात 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच या सिनेमाने १५० कोटींच्या घरात कमाई केली होती. पहिल्या दिवशी 'पुष्पा २'ने १६४.२५ कोटींचा गल्ला जमवला होता. रविवारनंतर सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळालं. आठव्या दिवशी सिनेमाने ३७.९ कोटींची कमाई केली. आत्तापर्यंत 'पुष्पा २'ने ७२६.२५ कोटी कमावले आहेत.
'पुष्पा २'ला मिळणारा प्रतिसाद पाहून अल्लू अर्जुनही भारावून गेला आहे. 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'पुष्पा ३'ची घोषणादेखील करण्यात आली आहे. आता 'पुष्पा २'नंतर 'पुष्पा ३'च्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत.