'पुष्पा २' सिनेमा रिलीज झालाय. सिनेमा रिलीज होताच सर्वजण अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक करत आहेत. 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अशातच 'पुष्पा २'मधील एका गोष्टीची मात्र चर्चा आहे ती म्हणजे फहाद फासिलने साकारलेला भंवर सिंग शेखावत. फहादने 'पुष्पा'च्या पहिल्या भागात या भूमिकेने चांगलाच भाव खाल्ला होता. पण 'पुष्पा २'मध्ये मात्र फहादने साकारलेली भूमिका लोकांना तितकी पसंत पडली नाही. त्यामुळे फहादने एक मोठा निर्णय घेतला.
फहाद कोणत्याही तेलुगु सिनेमात करणार नाही काम?
फहाद फासिलच्या निकटवर्तीय सूत्रांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार असं सांगितलं जातंय की, 'पुष्पा २' रिलीज झाल्यावर फहाद फासिलच्या भूमिकेचं कमी कौतुक होतंय. फहाद फासिलने सिनेमाच्या शूटिंगसाठी आवश्यक त्या तारखा दिल्या असूनही त्याचा म्हणावा तसा वापर केला गेला नाही. सेटवर अनेकदा काहीही काम नसल्याने फहाद फक्त बसून असायचा. दिग्दर्शक सुकुमार कधीकधी त्याचा एकही शॉट चित्रित करायचे नाहीत, अशाही बातम्या मीडियामध्ये आहेत. त्यामुळे फहादने भविष्यात कोणत्याही तेलुगु सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतलाय, असं सांगण्यात येतंय.
'पुष्पा २'ची चर्चा सर्वत्र
'पुष्पा २'ची सध्या चर्चा शिगेला आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारलीय. सध्या सर्वत्र अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या केमिस्ट्रीचं कौतुक होतंय. 'पुष्पा'च्या पहिल्या भागात पुष्पाराज आणि भंवर सिंग शेखावतमध्ये चांगलीच काँटे की टक्कर बघायला मिळाली. हीच टक्कर दुसऱ्या भागातही बघायला मिळेल अशी प्रेक्षकांना उत्सुकता होती. परंतु तसं काही न झाल्याने प्रेक्षकांनी फहादच्या अभिनयावर नाराजी व्यक्त केली.