मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध भारतीय मॉडेल सेन रचेलने आत्महत्या केली आहे. सॅन रचेल मूळची पाँडीचेरीला राहणारी असून तिने आत्महत्या केल्याची बातमी समोर येताच सर्वांना धक्का बसला आहे. पोलिसांनी तपास केल्यावर प्राथमिक माहिती अशी आढळून आली की, कर्ज आणि डिप्रेशनमुळे रचेलने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. याशिवाय रचेलने लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.
सुसाईड नोटमध्ये काय सापडलं?
३ जुलै रोजी तिने झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे सॅनला तातडीने JIPMER रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ‘मिस पाँडीचेरी २०२१’ आणि ‘मिस डार्क क्वीन तमिळनाडू २०१९’ अशी मानाची किताबं सॅन रचेल गांधीने जिंकली आहेत. ती केवळ २६ वर्षांची होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार, सॅन रचेल काही काळापासून आर्थिक समस्यांचा सामना करत होती. तिने तिचे दागिने विकले होते. वडिलांकडून तिला मदतीची अपेक्षा होती, परंतु तिथूनही साथ मिळाली नाही. तिच्या खोलीतून एक सुसाईड नोट देखील सापडली असून त्यात तिने लिहिले आहे की, “माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये.”
वर्णभेदाविरुद्ध उठवला होता आवाज
सॅन रचेलने वर्णभेदाविरुद्ध ठामपणे आवाज उठवला होता. अनेक मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडियावर ती लोकांच्या रंगाबद्दल ज्या कल्पना असतात त्याला आव्हान देणाऱ्या पोस्ट शेअर करत होती. त्यामुळे ती युवा वर्गासाठी प्रेरणा बनली होती. तिच्या आकस्मिक निधनामुळे चाहत्यांमध्ये आणि फॅशन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेकांनी तिच्या आत्महत्येचं कारण आर्थिक, मानसिक आणि सामाजिक दबाव असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.