मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील एका स्थानिक थिएटरमध्ये बुधवारी सायंकाळी ‘कुबेरा’ या चित्रपटाच्या एका शोदरम्यान एक भयंकर घटना घडली. चित्रपटाचा शो सुरु असताना अचानक थिएटरमधील छताचा भाग कोसळल्याने प्रेक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या भयंकर घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेविषयी सविस्तर जाणून घ्या.
कशी घडली घटना?
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. महबूबाबाद येथील मुकुंदा थिएटरमध्ये रात्री कुबेराचा शो होता. त्यादरम्यान ही घटना घडली. व्हायरल व्हिडीओत दिसतं थिएटरमधील खुर्च्यांवर छताचा भाग कोसळल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. सिनेमा अर्ध्यावरच थांबवण्यात आला असून सर्व प्रेक्षक थिएटरबाहेर गेले आहेत. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून, जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी थिएटर प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.
ही घटना घडल्यावर थिएटरचे कर्मचारी आणि उपस्थित प्रेक्षकांनी तातडीने खबरदारी घेत काही लोकांना सुरक्षित ठिकाणी नेलं. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. थिएटर व्यवस्थापनाकडून अद्याप याविषयी कोणतंही वक्तव्य समोर आलं नाहीये. मात्र छताची दुरुस्ती आणि इतर गोष्टींवर फेरतपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धनुष, नागार्जुन, रश्मिका मंदाना या कलाकारांचा 'कुबेरा' हा सिनेमा सध्या संपूर्ण देशात हाउसफुल्ल गर्दीत सुरु आहे. अनेकांना हा सिनेमा आवडत असल्याचं दिसतंय.