Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या 'आर्थिक देशभक्ती' आवाहनानंतर कमल हासन यांचे चित्रपटसृष्टीला खुले पत्र; म्हणाले, "परदेश दौऱ्यांवर अनावश्यक खर्च कशाला?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:53 IST

कमल हासन यांनी चित्रपटसृष्टीला अधिक कार्यक्षम आणि शिस्तबद्ध होण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना 'आर्थिक देशभक्ती' जोपासण्याचे आवाहन केले आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी १ वर्ष सोने खरेदी टाळणे, पेट्रोल-डिझेलची बचत करणे, स्वदेशी वस्तूंचा वापर यांसारख्या उपाययोजनांतून देशाला स्वावलंबी बनवण्याचा मंत्र त्यांनी दिला आहे. या सध्या सुरू असलेल्या जागतिक घडामोडींचा भारतीय चित्रपटसृष्टीवर काय परिणाम होऊ शकतो, यावर साऊथचे सुपरस्टार कमल हासन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. चित्रपटसृष्टीला अधिक कार्यक्षम आणि शिस्तबद्ध होण्याचे आवाहन केले आहे.

कमल हासन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर 'माझे आपल्या चित्रपटसृष्टीला आवाहन' असे एक सविस्तर पत्र शेअर केले आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल समर्थित सैन्यामध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक मंदीचा उल्लेख कमल हासन यांनी पत्रात केला आहे. "पश्चिम आशियातील संकट अधिकच गडद होत असून यामुळे ऊर्जा, व्यापार, वाहतूक आणि आर्थिक स्थिरतेवर दबाव वाढला आहे. इंधन, वीज आणि लॉजिस्टिक्स महाग झाल्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे बजेट आधीच कोलमडले आहे. येत्या काळात महागाईमुळे सामान्य लोकांच्या मनोरंजनावरील खर्चाच्या सवयी बदलतील" अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

चित्रपटांचा खर्च कमी करताना त्याचा फटका सेटवरील सर्वात जास्त मेहनत करणाऱ्या हातांना बसू नये, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. कमल हासन म्हणाले, "आर्थिक स्थिती सुधारण्याच्या नावाखाली कामगारांचे पगार, सुरक्षा, भोजन, प्रवास, निवास किंवा मानवी कामाचे वातावरण या गोष्टींशी कधीही तडजोड केली जाऊ नये. हे ओझे कष्टकऱ्यांवर टाकता येणार नाही".

पैशांचा अपव्यय कुठे होतो हे सांगताना त्यांनी  पूर्वतयारी नसणे, निर्मितीतील विलंब, कलाकारांसोबत जाणाऱ्या सहकाऱ्यांच्या अवाजवी फौजेवर होणारा खर्च आणि अनावश्यक परदेश दौरे यावर थेट बोट ठेवले. कमल हासन यांनी लिहिले, "प्रत्येक प्रेमकथा पॅरिसमध्येच का घडायला हवी आणि प्रत्येक मधुचंद्र स्वित्झर्लंडमध्येच का हवा? प्रेम व्यक्त करण्यासाठी परकीय चलन खर्च करण्याची गरज नाही. भारतीय चित्रपटसृष्टीने आणि भारतीयांनी आपल्या देशावर आणि त्याच्या सौंदर्यावर थोडा अधिक विश्वास ठेवला पाहिजे".


शेवटी, कमल हासन यांनी निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक, चित्रपटगृह मालक, संघटना आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सना एकत्र येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले. "अवाढव्य खर्चाला अनेकदा भव्य चित्रपट समजण्याची चूक केली जाते. मात्र, आपले अनेक उत्कृष्ट चित्रपट हे अवाजवी खर्चाने नव्हे, तर स्पष्ट विचार, शिस्त आणि दृढ निश्चयाने बनतात. आपण चित्रीकरणात शिस्त पाळली पाहिजे, आलिशान लवाजम्यावरील खर्च कमी केला पाहिजे आणि सेटच्या उभारणीत साहित्याचा पुनर्वापर वाढवला पाहिजे", असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kamal Haasan's appeal to film industry after Modi's call for economic patriotism.

Web Summary : Kamal Haasan urges film industry efficiency amid economic concerns, backing Modi's call for 'economic patriotism.' He criticizes unnecessary foreign shoots, advocating for budget control without worker exploitation, and prioritizing Indian locations.
टॅग्स :कमल हासननरेंद्र मोदी