आघाडीचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि इन्स्टाग्रामवरील स्टार धनश्री वर्मा यांनी काही दिवसांपूर्वी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर युझवेंद्र चहल सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. तर चहलशी नातं तुटल्यानंतर धनश्रीनेही जुन्या आठवणी मागे टाकून पुढे जाण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, घटस्फोटानंतर धनश्री वर्माचं नशीब फळफळलं असून, ती लवकरच सिनेसृष्टीत कलाकर म्हणून पदार्पण करणार आहे.
धनश्री ही लवकरच तेलुगू चित्रपट निर्माते दिल राजू यांच्या आकाशम दति वास्तव या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात धनश्री पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. तत्पूर्वी धनश्री वर्मा ही अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. तसेच त्यात तिने थोडाफार अभिनय केलेला आहे. मात्र या चित्रपटात ती डान्ससोबत अभिनयही करणार आहे.
धनश्री वर्मा हिच्या या चित्रपदाचं दिग्दर्शन शशी कुमार हे करत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये सगळ्या नव्या दमाच्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे. दक्षिणेतील कोरियोग्राफर यश हा या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.