Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुझी मुलं ISISमध्ये जातील", आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर अभिनेत्रीवर करण्यात आलेले लव्ह जिहादचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:18 IST

अभिनयामुळे प्रेक्षकांचं प्रेम मिळालेल्या प्रियामणिला मात्र आंतरधर्मीय विवाह केल्याने ट्रोल केलं गेलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियामणिने याबाबत भाष्य केलं.

प्रियामणि ही साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. द फॅमिली मॅन, आर्टिकल ३७०, जवान, मैदान अशा सुपरहिट सिनेमा आणि वेबसीरिजमधून प्रियामणिने तिच्या अभिनयाची झलक दाखवली. अभिनयामुळे प्रेक्षकांचं प्रेम मिळालेल्या प्रियामणिला मात्र आंतरधर्मीय विवाह केल्याने ट्रोल केलं गेलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियामणिने याबाबत भाष्य केलं. 

प्रियामणिने २०१७ मध्ये दिग्दर्शक मुस्तफा राज यांच्याशी विवाह केला होता. आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे अभिनेत्रीवर लव्ह जिहादचे आरोप करण्यात आले होते. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणि म्हणाली, "माझा साखरपुडा झाल्यानंतर मला ही आनंदाची बातमी माझ्या लोकांसोबत शेअर करायची होती. पण, त्यांनी या गोष्टीचा तिरस्कार केला. आणि माझ्यावर लव्ह जिहादचे आरोप लावले. तुमची मुलं ISIS मध्ये जातील असंही काही जण म्हणाले". 

ट्रोलिंगमुळे प्रियामणिच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. "मला माहीत आहे की मी सिनेइंडस्ट्रीत असल्यामुळे तुम्हाला हवं ते तुम्ही बोलू शकता. मात्र, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला यात का ओढता? ती व्यक्ती कोण आहे हेदेखील तुम्हाला माहीत नाही. आजही मी पतीसोबत कोणता फोटो पोस्ट केला तर १० पैकी ९ कमेंट्स या आमचा धर्म आणि जातीबद्दल असतात", असंही प्रियामणि म्हणाली.  

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी