Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियामणीनं कोचीच्या महादेव मंदिरात दान केला यांत्रिक हत्ती, कारण ऐकून कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 13:55 IST

'जवान', 'आर्टिकल 370' फेम अभिनेत्री प्रियामणीने महादेव मंदिरात एक यांत्रिक हत्ती दान केलाय. त्यामागचं कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

'चेन्नई एक्सप्रेस' मधील वन टू थ्री फोर या गाण्यातून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे प्रियामणी. पुढे 'फॅमिली मॅन' सिरीजमध्ये मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारून प्रियामणीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. शाहरुख खानसोबत 'जवान' आणि नुकत्याच रिलीज झालेल्या 'आर्टिकल 370' अशा सिनेमांमध्येही तिने चांगलं काम करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. प्रियामणीने नुकतीच एक खास गोष्ट केलीय ज्यामुळे तुम्हीही तिचं कौतुक कराल.

प्रियामणीने कोचीमधील महादेव मंदिरात एक हत्ती दान केलाय. विशेष म्हणजे हा हत्ती खराखुरा नसून तो यांत्रिक हालचाली करणारा आहे. त्याचं नाव 'महादेवन' असं ठेवण्यात आलंय. झालं असं की.. केरळमधील कोची महादेव मंदिराने प्राण्यांच्या काळजीपोटी हत्तींना मंदिर परिसरात न ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रियामणीने 'पेटा'च्या सहकार्याने महादेव मंदिरासाठी एक यांत्रिक हत्ती दान केलाय. 

या विशेष उपक्रमाबद्दल प्रियामणी भावना व्यक्त करताना म्हणते, "आपण औद्योगिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या प्रगती करत आहोत. आपल्या प्रथा - परंपरा यांना धक्का न लावता आपण या प्रगतीचा वापर करु शकतो. यामुळे प्राण्यांना कोणतंंही नुकसान होणार नाही." केरळमध्ये आणलेला हा दुसरा यांत्रिक हत्ती आहे. प्रियामणी लवकरच अजय देवगणसोबत 'मैदान' सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :केरळबॉलिवूडशाहरुख खानयामी गौतमकलम 370