Join us

केसात गजरा माळला म्हणून अभिनेत्रीला भरावा लागला लाखो रुपयांचा दंड, एअरपोर्टवरील 'हा' नियम तुम्हाला माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 10:20 IST

तुम्हीही केसात गजरा माळून परदेश प्रवास करताय? मग एअरपोर्टवरील हा महत्वाचा नियम आताच जाणून घ्या. अभिनेत्रीला लाखो रुपयांचा दंड बसला आहे

केसात गजरा माळल्याने एका अभिनेत्रीला तब्बल सव्वा लाख रुपयांचा दंड बसला आहे. एअरपोर्टवरील एक महत्वाचा नियम माहित नसल्याने या अभिनेत्रीला इतका मोठा दंड भरावा लागला. ही अभिनेत्री आहे नव्‍या नायर. नव्याला नुकताच ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर हा लाखो रुपयांचा दंड भरावा लागला. याचे कारण होते की तिने आपल्या केसांमध्ये फुलांचा गजरा माळला होता. पण ऑस्ट्रेलियातील एका नियमामुळे तिला सव्वा लाखांचा दंड भरावा लागला. काय घडलं नेमकं?

तो नियम आणि भरावा लागला मोठा दंड

नव्याने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही घटना सविस्तर शेअर केली आहे. ती म्हणाली की, सिडनी विमानतळावर पोहोचल्यावर ऑस्ट्रेलियन कस्टम आणि बायोसेक्युरिटी विभागाने तिला तपासणीसाठी थांबवले. अधिकाऱ्यांनी तिच्या केसांमधील फुलांच्या गजऱ्याबद्दल विचारपूस केली. गजऱ्यामध्ये नैसर्गिक फुले असल्यामुळे त्यांना देशात आणण्याची परवानगी नाही, असे अधिकाऱ्यांनी तिला स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियाचे नियम अत्यंत कठोर आहेत. या नियमांनुसार कोणत्याही प्रकारची नैसर्गिक वनस्पती किंवा वस्तू देशात आणण्यास मनाई आहे. संसर्गजन्य रोग किंवा कीटकांचा प्रसार होऊ नये, यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत नव्याला या नियमांची अजिबात कल्पना नव्हती. या अनपेक्षित चुकीमुळे नव्याला मोठी किंमत चुकवावी लागली. अधिकाऱ्यांनी तिच्यावर १.२५ लाखांचा मोठा दंड ठोठावला. ही रक्कम ऐकून ती पूर्णपणे हादरली. नव्‍या नायरने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ''केसांत गजरा घालून ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्याचा प्रयत्न मला एवढा महागात पडेल, अशी मला कल्पनाही नव्हती. या दंडामुळे माझं मोठं आर्थिक नुकसान झालं.''

हा प्रसंग नव्‍यासाठी केवळ एक मोठा धक्काच नव्हे, तर एक महत्त्वाची शिकवणही ठरला. तिने तिच्या सर्व चाहत्यांना आणि परदेशी प्रवास करणाऱ्यांना आवाहन केले आहे की, परदेशात प्रवास करताना त्या देशाच्या कस्टम आणि इतर नियमांबद्दल आधीच सविस्तर माहिती घ्यावी. अशा नियमांकडे दुर्लक्ष केल्याने मोठा दंड भरावा लागू शकतो किंवा प्रवासात अनावश्यक अडथळे येऊ शकतात.

टॅग्स :Tollywoodबॉलिवूडमराठी अभिनेताविमानतळविमानआॅस्ट्रेलिया