Join us

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता OTT गाजवणार 'हा' हॉरर-कॉमेडी चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:42 IST

तुम्हाला हॉरर-कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा!

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये हॉरर आणि कॉमेडी यांचे मिश्रण असलेले चित्रपट खूप लोकप्रिय झाले आहेत. 'स्त्री २' आणि 'मुंज्या' सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. प्रेक्षकांची ही वाढती आवड लक्षात घेता, आता आणखी एक हॉरर-कॉमेडी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, ज्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला नाही, ते आता घरबसल्या पाहू शकतील. 

विष्णू शशी शंकर दिग्दर्शित आणि अभिलाष पिल्लई लिखित 'सुमती वलवू' (Sumathi Valavu) या चित्रपटाची कथा केरळ-तामिळनाडू सीमेवरील एका गावातील आहे. ही कथा १९९० च्या दशकात एका भटक्या रस्त्याभोवती फिरते, जिथे सुमती नावाच्या एका आत्म्याचा वावर असतो. यात अर्जुन अशोकन, गोकुल सुरेश, सैजू कुरुप, बालू वर्गीस, मालविका मनोज आणि शिवदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अडीच तासांचा हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. १४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे २५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. बॉक्स ऑफिसवरील यशासोबतच या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.७ चे रेटिंग मिळाले आहे.

आता हा हॉरर-कॉमेडी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. येत्या २६ सप्टेंबर २०२५ पासून हा चित्रपट झी५ (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. विशेष म्हणजे, हा चित्रपट केवळ मल्याळम भाषेतच नाही, तर हिंदी, तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्येही उपलब्ध असणार आहे.

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी