Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कोणताही जल्लोष आयुष्यापेक्षा मोठा नाही.."; बंगळुरुच्या दुर्दैवी घटनेवर सोनू सूदने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:36 IST

बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेवर सोनू सूदने त्याचं मत व्यक्त केलंय.

बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ४ जून २०२५ रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या आयपीएल विजयाच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले. ही दुर्दैवी घटना झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली. या दुर्घटनेवर अनेक कलाकार त्यांची खंत व्यक्त करत आहेत. अशातच  या दुर्घटनेनंतर अभिनेता सोनू सूद यांनी सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त केली. काय म्हणाला सोनू?

सोनू सूदने व्यक्त केली खंत, म्हणाला...

सोनू सूद यांनी ट्विटरवर या दुर्दैवी घटनेविषयी खंत व्यक्त केली. सोनू लिहितो, "बेंगळुरूतील आयपीएल उत्सवादरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मन खूप दुखावले आहे. कोणताही उत्सव किंवा जल्लोष जीवनापेक्षा मोठा नाही. पीडित कुटुंबीयांसाठी आणि सर्व प्रभावित लोकांसाठी प्रार्थना करतो." अशा शब्दात सोनूने त्याची खंत व्यक्त केली आहे. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएल स्पर्धा जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. ४७ जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

RCB टीमने व्यक्त केलं दुःख

विराट कोहली आणि आरसीबी संघाच्या स्वागतासाठी सुमारे तीन लाखांवर लोक जमा झाले होते. बसमधून या खेळाडूंची रॅली अचानक रद्द करण्यात आली होती. तसेच हा विजयोत्सवाचा कार्यक्रम बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर ठेवण्यात आला होता. या स्टेडिअमची प्रेक्षकांची क्षमता ही काही हजारांत होती, यामुळे गेटवर प्रचंड गर्दी जमा झाली होती. यात चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा बळी गेला. 

या घटनेनंतर RCB संघानेही अधिकृत निवेदनाद्वारे दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, "आम्हाला ही दुर्दैवी बातमी कळताच आम्ही तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेने आम्ही अत्यंत व्यथित आहोत आणि पीडित कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो." 

टॅग्स :सोनू सूदबंगलोर सेंट्रलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेंगराचेंगरी