Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (२५ जानेवारी २०२५ )केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2025) घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये संगित क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने गोरवण्यात आलं आहे. संगीत क्षेत्रात मोठं योगदान दिल्याने अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर लोक गायिका शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. गायक पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. पद्म पुरस्काराच्या घोषणेनंतर आता गायक सोनू निगमने नाराजी व्यक्त केली आहे.
सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. किशोर कुमार, अलका याज्ञिक आणि श्रेया घोषाल यांचा सन्मान न केल्याबद्दल सोनू निगमने पद्म पुरस्कार 2025 वर प्रश्न उपस्थित केला. "भारत आणि त्याचे प्रलंबित पद्म पुरस्कार प्राप्तकर्ते" असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणाला, असे दोन गायक ज्यांनी जगभरातील गायकांना प्रेरणा दिली आहे. त्यातील एका गायकाला फक्त पद्म श्री पुरस्कार दिला गेलाय. ते म्हणजे मोहम्मद रफी आणि दुसरे म्हणजे ज्यांना पद्मश्रीही मिळाला नाही ते म्हणजे किशोर कुमार".
पुढे तो म्हणाला, "आता हयात असलेल्यांमध्ये, अल्का याज्ञिक यांची कारकीर्द इतकी मोठी आणि अद्भुत आहे. पण त्यांना अजून काहीही मिळालेलं नाही. श्रेया घोषाल देखील बऱ्याच काळापासून तिच्या कलेची ओळख करून देत आहे. तिलासुद्धा हा पुरस्कार मिळाला पाहिजे. सुनिधी चौहान, तिने एका संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. तिलासुद्धा अजून कोणताही पुरस्कार मिळालेला नाही. आणि अशी अनेक नावे आहेत, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असोत, अभिनय क्षेत्रातील असोत किंवा विज्ञान क्षेत्रातील असोत, ज्यांना अजूनही न्याय मिळाला नाही असं वाटतंय". सोनू निगमच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीसुद्धा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सोनू निगमला पाठिंबा दिलाय.