Sonu Nigam Pune Concert : मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात असतात. पण, त्रास बाजूला सारून ते आपली कला सादर करतात. असचं काहीस झालं आहे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यासोबत. सोनू निगम सध्या पाठदुखीनं त्रस्त आहे. यावर तो उपचारही घेत आहे. पण, काल पुण्यात भर कॉन्सर्टदरम्यान त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला, यावेळी तो वेदनेने कळवळला. पण, वेदना सहन करत त्यानं गाणी गायली. आपण त्रासात आहोत, हेदेखील त्यानं चाहत्यांना कळू दिलं नाही.
कॉन्सर्ट झाल्यानंतर सोनू निगमने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर प्रकृतीबद्दल माहिती दिली. व्हिडीओमध्ये सोनू निगम हा कॉन्सर्टमध्ये बॅक स्टेजवर पाठीच्या त्रासानं ओरडताना दिसतोय. कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "सरस्वतीजींनी काल रात्री माझा हात धरला होता". तो म्हणतो, "हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता, पण समाधानकारकही राहिला. गाणे गाताना माझ्या मणक्यात क्रॅम्प आला. कोणीतरी माझ्या पाठीवर सुई टोचत असल्यासारखे वाटत होतं. पण मी कसं तरी ते आटोक्यात आणलं. कॉन्सर्ट चांगला झाला, याचा मला आनंद आहे. लोकांना निराश करायला आवडत नाही, मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला". तर सर्व चाहते तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहेत.
सोनू निगम हा एक संगीत दिग्दर्शक, गायक, डबिंग कलाकार आणि अभिनेता आहे. त्याने हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तो बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांपैकी एक आहे आणि त्याच्या नावावर पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार आहेत. सोनू निगमला 'मॉडर्न रफी' म्हणूनही ओळखलं जातं. ही पदवी चाहत्यांनी त्याला दिली आहे. कारण तो दिग्गज गझल गायक मोहम्मद रफी यांना आदर्श मानतो.