Join us

अनिल कपूरचा खोटा कोरोना रिपोर्ट पाहून भडकली सोनम कपूर, व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 11:28 IST

अनिल कपूरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे खोटे वृत्त गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत होत्या.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या खोट्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत होत्या. त्यानंतर अनिल कपूरने स्वत: ट्विट करत याचा खुलासा केला. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून सोशल मीडियावर पसरणाऱ्या बातम्या फोल असल्याचे अनिल कपूरने ट्विटमध्ये सांगितले आहे. दरम्यान, यावर अनिल कपूरची लेक सोनम कपूर चांगलीच भडकली आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून चुकीचे वृत्त देणे भयानक असल्याचे म्हटले आहे. तसेच जबाबदारीने पत्रकारिता करण्याचा सल्लाही तिने दिला आहे.

सोनम कपूरने ट्विट केले की, "चुकीच्या बातम्या देणे भयानक आहे. मी लंडनमध्ये आहे आणि मी माझ्या वडिलांशी बोलण्यापूर्वीच काही मीडियातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. कृपया पत्रकारीता जबाबदारीने करा." 

तर अनिल कपूरने ट्विटमध्ये लिहिले की, "अफवांना पूर्णविराम देण्यासाठी सांगतो की, माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तुमच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे."

अनिल कपूर चंदीगढमध्ये वरुण धवन, कियारा आडवाणी आणि नीतू सिंगसोबत 'जुग जुग जियो'चे शूटिंग करत होते. या चित्रीकरणादरम्यान, नीतू सिंग आणि दिग्दर्शक राज मेहता यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आणि शूटिंग थांबवण्यात आले.

राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट एक रोमँटिक विनोदी चित्रपट आहे.आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अनिल कपूर आणि नीतू कपूर यांची जोडी रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे चित्रपटात कियारा आणि वरुण धवन यांच्याही भूमिका आहेत.

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूर