Join us

Sitaare Zameen Par : चेहऱ्यावर आनंद अन् डोळ्यात पाणी! नेटकऱ्यांना कसा वाटला आमिरचा 'सितारे जमीन पर'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:15 IST

Sitaare Zameen Par Movie Review : आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या खास प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हीही सिनेमा पाहण्याचा विचार करत असाल तर जरुर वाचा

Sitaare Zameen Par : आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित 'सितारे जमीन पर' सिनेमा आज रिलीज झाला आहे.  हा सिनेमा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होता. आमिरने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली. याशिवाय आमिरसोबत या सिनेमात जिनिलिया देशमुखही झळकत आहे.  'सितारे जमीन पर'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या खास प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घ्या  'सितारे जमीन पर' पाहून नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'सितारे जमीन पर' पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे

एका सोशल मीडिया युजरने लिहिले, "आत्ताच 'सितारे जमीन पर' पाहिला. हो, हा 'चॅम्पियन्स'चा रिमेक आहे, पण हा सिनेमा अत्यंत हृदयस्पर्शी आहे. प्रत्येकाने अत्यंत खरेपणाने काम केलंय. आमिरने प्रामाणिकपणे अभिनय केला आहे. याशिवाय नवोदित कलाकारांनी मैफिल लुटली आहे. भावनिक, उत्साहवर्धक आणि तुमची वेळ सार्थकी लागेल असा सिनेमा आहे."

आणखी एका युजर्सने लिहिले, "खऱ्या अर्थाने चॅम्पियन! सितारे जमीन पर पाहून तुम्हाला हसायला येईल, रडायला येईल आणि अभिमान वाटेल. मूळ सिनेमाचं अत्यंत सुंदर रूपांतर आहे. परफेक्शनिस्ट आमिर खानने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे. सितारे जमीन पर नक्की बघा."

आणखी एका युजरने लिहिले, "हा चित्रपट फक्त "ताऱ्यां"बद्दल नाही. १ २ ३ ४ ५ असं रेटिंग देऊन सितारे जमीन परचं मोजमाप करू शकत नाहीत. तुम्ही त्या खास मुलांचं आणि आमिर खानचं खूप कौतुक कराल. हा अत्यंत भावनिक, प्रभावी आणि खरोखर एक खास सिनेमा आहे. सितारे जमीन पर जरूर पहावा. जरूर पहावा. बस्स."

एक नेटकऱ्याने लिहिलं की, "सितारे जमीन पर तुम्हाला स्पर्श करतो, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. हा सिनेमा तुम्हाला मोठ्याने हसवतो, सिनेमा पाहून तुमचे डोळे पाणावतात आणि तुम्हाला जगण्याची आशा देतो. आमिर खानसारखा सुपरस्टार इतका धाडसी सिनेमा बनवण्यासाठी आपला वेळ, पैसा खर्च करतोय हे आश्वासक चित्र आहे."

अशाप्रकारे नेटकऱ्यांनी  'सितारे जमीन पर' सिनेमाचं खूप कौतुक केलं आहे. 'सितारे जमीन पर'  हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात १० नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा विशेष सहभाग आहे. आमिर - जिनिलीया या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

टॅग्स :आमिर खानजेनेलिया डिसूजाबॉलिवूड