बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'सिंघम अगेन' सिनेमा अखेर दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. सिंघम ३ नंतर या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता होती. रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन' सिनेमातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर अॅक्शनचा धमाका केला. पहिल्या दिवसापासूनच 'सिंघम अगेन' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच हा सिनेमा ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'सिंघम अगेन'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन'मधून अख्खं बॉलिवूडच मोठ्या पडद्यावर उतरवलं. अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमात अंकित मोहन, भाग्या नायर हे मराठी कलाकारही झळकले आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने आत्तापर्यंत २१८.४७ कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता रोहित शेट्टीचा सिनेमा ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे.
'सिंघम अगेन' सिनेमाचे ओटीटी राइट्स अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने खरेदी केले आहेत. त्यामुळे हा सिनेमा प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. १ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला 'सिंघम अगेन' सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमाची ओटीटी रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. मात्र डिसेंबर महिन्यात 'सिंघम अगेन' ओटीटीवर प्रदर्शित केला जाऊ शकतो.