२०२४ मध्ये आलेला 'सिंघम अगेन' सिनेमा खूप चालला. या सिनेमात मल्टिस्टारर कलाकारांसोबत खलनायक म्हणून अर्जुन कपूरने सर्वांचं लक्ष वेधलं. 'सिंघम अगेन' सिनेमात अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार असे एकापेक्षा एक कलाकार होते. या सर्व कलाकारांमध्ये अर्जुन कपूर खलनायक म्हणून चांगलाच भाव खाऊन गेला. अर्जुन कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. ती म्हणजे अर्जुन कपूरच्या नवीन वर्षातील सिनेमाची घोषणा झालीय.
अर्जुन कपूरचा नव्या वर्षात नवीन सिनेमा
'सिंघम अगेन'नंतर अर्जुन कपूर आता 'मेरी हसबंड की बिवी' सिनेमात अभिनय करणार आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज झालंय. अर्जुनसोबत या सिनेमात बॉलिवूडमधील आघाडीच्या दोन अभिनेत्री झळकणार आहेत. त्या म्हणजे भूमी पेडणेकर आणि रकूल प्रीत सिंग. मुदस्सर अजीझ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. त्यामुळे एकूणच अनेक दिवसांनी अर्जुन कपूर प्रेक्षकांना रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे.
कधी रिलीज होणार हा सिनेमा
'मेरी हसबंड की बिवी' हा सिनेमा नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार आहे. 'लव्ह ट्रँगल नही सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. जॅकी भगनानी आणि वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केलीय. २१ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अर्जुन कपूर कशी कमाल करणार? सिनेमा सुपरहिट होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.