Join us

"मला मराठी सिनेमासाठी मल्टिप्लेक्स बांधायचंय...", सिद्धार्थ जाधवने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...

By कोमल खांबे | Updated: July 24, 2025 13:13 IST

सिद्धार्थ 'येरे येरे पैसा ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मराठी सिनेमासाठी थिएटर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. 

सिद्धार्थ जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील स्टार अभिनेता. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. मराठी सिनेसृष्टीचा रणवीर सिंग अशी ओळख मिळवलेला सिद्धार्थ 'येरे येरे पैसा ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मराठी सिनेमासाठी थिएटर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. 

सिद्धार्थ म्हणाला, "मी मराठी सोडून बाकीचे सिनेमा खूप फॉलो करतो. म्हणजे बंगाली वगैरे... तर तिथे ना देव, जीत नावाचे सुपरस्टार आहेत तिकडचे...त्यांनी बंगालमध्ये स्वत:चे मल्टिप्लेक्स बांधले आहेत. फक्त त्यांच्या सिनेमांसाठी नाही पण एक अभिनेता झाल्यानंतर... तर मला असं वाटतं की आमच्यासाठी आयकॉनिक म्हणजे मराठी सिनेमांचं माहेरघर जे लहानपणापासून आपण ऐकतोय ते म्हणजे भारतमाता थिएटर, प्लाझा थिएटर किंवा पुण्याचं प्रभात थिएटर. मला माहित नाही किती पैसे असतील ते बांधण्यासाठी पण मला मराठी सिनेमासाठी असं एक थिएटर किंवा मल्टिप्लेक्स बांधायचंय की पुढच्या येणाऱ्या पिढीला कळेल की हे मराठी सिनेमाचं माहेरघर आहे". 

"असं काहीतरी करायला मला आवडेल. जिथे मराठी सिनेमा लागतील. म्हणजे ३-४ स्क्रीन असतील आणि मराठी सिनेमा लागतीलच लागतील. ते पुढच्या पिढीसाठी मराठी सिनेमाचं माहेरघर असेल ज्याचं नाव कदाचित भारत माताचा प्लाझा प्रभातमध्ये येऊन सिनेमा पाहा अशी टॅगलाईन वगैरे असेल. हे आयकॉनिक थिएटर अजूनही मनात आहेत. ते सिंगल स्क्रीन होते. तिथे पंखे चालू आहेत. गर्मी आहे पण सिनेमावर प्रेम करणारा प्रेक्षक आहे. ज्याला या गोष्टींची तमा नाही पण तो सिनेमात पूर्ण घुसलाय. तसं काहीतरी थिएटर मला मराठी सिनेमासाठी बांधायला आवडेल", असंही सिद्धार्थ पुढे म्हणाला. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसिनेमामराठी अभिनेता