Prem Dhillon House Firing: पुन्हा एकदा एका पंजाबी गायकाच्या बंगल्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. कॅनडामध्येपंजाबी गायक प्रेम ढिल्लनच्या बंगल्यावर गोळीबार केला. मात्र, गोळीबारात कोणतेही नुकसान झाले नाही. गोळीबारीची जबाबदारी जेंटा खरड यानं घेतली आहे. जेंटा खरड हा जयपाल भुल्लर टोळीशी जोडला गेला आहे. इतकंच नाही तर तो खालिस्तानी दहशतवादी अर्श डाला याच्या संपर्कात असल्याचंही म्हटलं जात आहे.
कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आरोपींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्याची जबाबदारी घेत, जयपाल भुल्लर टोळीने आपल्या कथित पोस्टमध्ये दिवंगत गायक सिद्धू मूसेवालाचेही नावही घेतले आहे. ज्याची २०२२ मध्ये पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. प्रेम ढिल्लन जर सुधारला नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे.
प्रेम ढिल्लन यांचे पूर्ण नाव प्रेमजीत सिंग ढिल्लन असून त्याचा जन्म अमृतसरमध्ये झाला. २०१९ मध्ये सिद्धू मूसेवालाच्या 'बूट कट' या गाण्याने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली होती. याआधीही कॅनडामध्ये पंजाबी गायक एपी ढिल्लन यांच्या घरावर गोळीबाराची घटना घडली होती, ज्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती. या प्रकरणात कॅनेडियन पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली होती. पंजाबी संगीत उद्योगात वाढत्या गुन्हेगारींमुळे कलाकारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा संस्था या घटनांचा गांभीर्याने तपास करत आहेत.