गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला हिंदी-मराठी वाद अखेर मिटला. पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याचा जीआर सरकारने मागे घेतला. सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आक्रमक झाले होते. जीआर रद्द झाल्यानंतर दोन्ही भाऊ अनेक वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांनी विजयी मेळावा घेतला. या मेळाव्याला काही मराठी कलाकारांनीही हजेरी लावली होती. दरम्यान काही कलाकारांनी मात्र पाठही फिरवली. नुकतंच अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelkar) या वादावर प्रतिक्रिया दिली.
शरद केळकरने मराठी, हिंदीसह साऊथमध्येही काम केलं आहे. त्याच्या भारदस्त आवाजाचे आणि अभिनयाचे लोक चाहते आहेत. हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावरुन झालेल्या वादावर त्याला प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा तो म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचं तर मला या राजकीय गोष्टींमध्ये पडायचं नाही. मला त्यात रस नाही. मला अभिनयाविषयी विचारा मी बोलेन. मी मराठी सिनेमात कधी दिसणार विचारा मी सांगेन. पण हे कोणाच्या वैयक्तिक इच्छा किंवा प्राधान्याबद्दल असून नये. भारतातील सर्वच भाषा सुंदर आहे यावर माझा विश्वास आहे. मी सर्वप्रथम भारतीय आहे."
शरद केळकर त्याच्या आगामी मालिकेसाठी सर्वात जास्त मानधन घेणारा टीव्ही अभिनेता ठरला आहे. यावर तो म्हणाला, "मी गेल्या दोन दशकांपासून काम करत आहे. मी माझं स्थान निर्माण केलं आहे आणि त्यासाठी मी मानधन घेतो. यात चूक काय? जर कोणी चांगलं कमावत असेल तर लोकांनी खूश व्हायला हवं ना की तुम्हाला त्याप्रती इर्ष्येची भावना यावी. हे खरंतर यशाचंच चिन्ह आहे. जर अभिनेत्याने टीव्हीवर कमबॅक केलं आहे तर त्यामागे त्याचं कर्तृत्वच आहे. कोणीही तुम्हाला भूतकाळातील आठवणींसाठी परत बोलवत नाहीये तर नवीन काहीतरी दाखवण्यासाठी तुम्हाला संधी देत असतो."