Join us

'आदिपुरुष'च्या हिंदी व्हर्जनसाठी मराठमोळ्या अभिनेत्याने दिलाय आवाज; श्रेयसनंतर होतीये 'या' अभिनेत्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 16:45 IST

Adipurush: 'आदिपुरुष'पूर्वी 'पुष्पा' या गाजलेल्या दाक्षिणात्य सिनेमासाठी श्रेयस तळपदे याने त्याचा आवाज दिला होता. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने पुन्हा एकदा साऊथच्या सिनेमाला आवाज दिला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याची मुख्य भूमिका असलेला 'आदिपुरुष' (adipurush) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या सिनेमात लोकप्रिय मराठी अभिनेता देवदत्त नागे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यानंतर या सिनेमासाठी आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे. या अभिनेत्याने आदिपुरुषच्या हिंदी डबसाठी प्रभासला आवाज दिला आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे.

'आदिपुरुष'पूर्वी 'पुष्पा' या गाजलेल्या दाक्षिणात्य सिनेमासाठी श्रेयस तळपदे याने त्याचा आवाज दिला होता. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने पुन्हा एकदा साऊथच्या सिनेमाला आवाज दिला आहे. अभिनेता शरद केळकर आदिपुरुषच्या हिंदी डबला त्याचा आवाज देणार आहे.  

'आदिपुरुष’मध्ये प्रभास मुख्य भूमिका साकारत आहे. हा सिनेमा तेलुगू, तामिळ, मल्याळम यांच्यासह हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी प्रभास साकारत असलेल्या श्रीरामांच्या भूमिकेला शरद केळकर त्याचा आवाज देणार आहे.  यापूर्वी शरद केळकरने प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटासाठी डबिंग केले होते. 

“प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी डबिंग करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. दिग्दर्शक ओम राऊतला पहिल्या दिवसापासूनच आदिपुरुषमधील प्रभासच्या भूमिकेसाठी माझा आवाज हवा होता. बाहुबलीमधील माझ्या आवाजाला प्रेक्षकांनी एवढे वर्ष लक्षात ठेवले. आता यापुढे प्रेक्षक मला प्रभू श्री रामांच्या भूमिकेच्या आवाजासाठी लक्षात ठेवतील,” असं शरद केळकरने एका मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, या सिनेमात प्रभास (Prabhas) हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) सीतेची भूमिका साकारणार आहे. तसंच देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारत आहे.  हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :आदिपुरूषशरद केळकरप्रभासदेवदत्त नागेसिनेमासेलिब्रिटी