Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:31 IST

प्रियाच्या निधनानंतर शंतनू पुन्हा कामावर परतला आहे. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत तो दिसत आहे.

अभिनेत्री प्रिया मराठेचं ३१ ऑगस्ट रोजी कर्करोगाने  निधन झालं. गेल्या दीड वर्षांपासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. पहिल्या वेळी तिने कॅन्सरवर मात केली होती. मात्र त्याने पुन्हा डोकं वर काढलं आणि यावेळी ती हरली. प्रियाच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्काच बसला. प्रियाचा पती शंतनू मोघेने शेवटपर्यंत तिची साथ दिली. दीड वर्षापासून तोही काम सोडून फक्त प्रियाच्या सोबत होता. तिला वेळ देत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एन्ट्री घेतली होती. त्याचा एपिसोड प्रियाने आदल्या रात्रीच पाहिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या निधनानंतर शंतनू पुन्हा मालिकेत दिसत असून त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शंतनू मोघे म्हणाला, "मधल्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं गरजेचं होतं. म्हणून मी कुठेही दिसलो नाही. आयुष्यातलं ते वळण पार केल्यानंतर आता पुन्हा कामावर परतलो आहे. माझे वडील नेहमी सांगायचे की आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात किती संघर्ष असला तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहायचं. त्यात कसर सोडायची नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं. वैयक्तिक सुख-दु:ख खुंटीला बांधून आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं सुख दु:ख आपलंसं करणं हाच कलाकाराचा धर्म असतो. काहीही झालं तरी आपल्या कलेशी असलेली कमिटमेंट पाळायची हा आपण स्वत:शीच केलेला करार असतो. त्यामुळे काम करत राहणं हीच प्रियाला माझी श्रद्धांजली आहे. आजपर्यंत प्रिया आणि माझ्यावर सर्व प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं हीच आमची खरी ताकद आहे."

"माझी मालिकेत शंतनू ही मंजिरीच्या दादाची भूमिका आहे. या भूमिकेला अनेक छटा आहेत. सध्या मी नकारात्मक भूमिकेत वाटत असलो तरी इतर छटा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतील. तसंच मधल्या काळात मला समजून घेतल्याबद्दल मी स्टार प्रवाह वाहिनी, सतीश राजवाडे आणि सोल प्रोडक्शनचा कायमच ऋणी असेन."

प्रियाच्या निधनानंतर सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, मृणाल दुसानिससह अनेक कलाकारांनी भावुक प्रतिक्रिया दिली. तेव्हा प्रत्येकानेच शंतनूचं कौतुक केलं. शंतनूने प्रियाची शेवटपर्यंत काळजी घेतली होती. तिच्यामागे खंबीरपणे उभा राहिला होता. प्रिया आणि शंतनूचं एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं असं सुबोध भावे म्हणाला होता. शंतनू आणि प्रिया यांच्या लग्नाचा १२ वर्ष झाली होती. 

टॅग्स :शंतून मोघेप्रिया मराठेमराठी अभिनेताटेलिव्हिजन