बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. मात्र वडिलांसारखा तो कॅमेऱ्यासमोर नाही तर कॅमेऱ्यामागे असणार आहे. नेटफ्लिक्सने काल वर्षभरात रिलीज होणाऱ्या सर्व सिनेमा, सीरिजची घोषणा केली. यामध्ये 'Bas***ds of Bollywood या सीरिजचाही समावेश आहे ज्याचं दिग्दर्शन आर्यन खानने केलं आहे. लेकाच्या पहिल्याच सीरिजच्या घोषणेसाठी स्वत: शाहरुख खानने इव्हेंटला हजेरी लावली. यावेळी तो मुलांबद्दल काय म्हणाला वाचा.
काल नेटफ्लिक्सने भव्य इव्हेंटचं आयोजन केलं होतं. यावर्षी नेटफ्लिक्सवर ५ सिनेमे, १० सीरिज आणि ५ शोज रिलीज होणार आहेत. या सर्व प्रोजेक्ट्समधील कलाकार इव्हेंटला उपस्थित होते. २ स्टारकीड्सही यावर्षी पदार्पम करत आहेत. यामध्ये आर्यन खानच्या 'Bas***ds of Bollywood' सीरिजची घोषणा झाली. स्वत: शाहरुख खान गौरी आणि सुहानासह इव्हेंटमध्ये सहभागी झाला. मुलांविषयी बोलताना तो भावुक झाला होता. शाहरुख म्हणाला, "आर्यन आपला पहिला शो दिग्दर्शित करतोय तो या प्लॅटफॉर्मवर आहे याचा मला आनंद आहे. खूप मेहनत घेतली आहे, संपूर्ण टीमने अनेक वर्ष यासाठी प्रयत्न केला आहे. मेहनतीचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. कारण आता हे सगळं कुटुंबात आलं आहे तर आमचं कर्तव्य आहे की आम्ही तुमचं मनोरंजन करु."
तो पुढे म्हणाला, "हा थोडा फॅमिली शोच झाला कारण नेटफ्लिक्स माझ्यासाठी कुटुंबासारखंच आहे. शोची निर्माती गौरी आहे तर दिग्दर्शक आर्यन आहे. मी मनापासून विनंती करतो की माझा मुलगा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे, माझी मुलगी अभिनेत्री बनत आहे, माझ्यावर जितकं प्रेम केलंत त्याच्या ५० टक्केही त्यांच्यावर केलंत तरी खूप आहे."
दुसरीकडे खान बाप बेटाने सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख स्टेजवर अभिनय करतोय तर आर्यन कॅमेऱ्यामागे आहे. मात्र तो सतत शाहरुखला 'कट कट' म्हणत थांबवतो. नंतर शाहरुखला राग येतो आणि तो एकदाच त्यांना ओरडतो. शाहरुखने लेकाच्या सीरिजची ही हटके घोषणा सोशल मीडियावर अशा पद्धतीने केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये आर्यन चक्क हसतानाही दिसतोय. शेवटी शाहरुख त्याला गंमतीत मारायला येतो तेव्हा आर्यन 'बेटे को हात लगाने से पहले...' असा डायलॉग म्हणत पळतो. एकंदरच हा व्हिडिओ मजेशीर आहे.
ही सीरिज नक्की कधी रिलीज होणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र बॉलिवूडमधील अनेक आतल्या गोष्टी सीरिजमधून कळणार आहेत. आर्यन आणि त्याच्या मित्रांनी मिळून सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.