Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाहत्यांची प्रतीक्षा संपणार? 'थलायवा' अन् 'किंग खान' एकत्र दिसणार; 'त्या' पोस्टमुळे वाढली उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:29 IST

एका पोस्टमुळे बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये सुरु झाली चर्चा, चाहतेही खूश

शाहरुख खान आणि रजनीकांत या दोन महानायकांना एकाच पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कधीपासून उत्सुक आहेत. यापूर्वी शाहरुखच्या 'रा.वन' चित्रपटात रजनीकांत यांच्या 'चित्ती' या पात्राचा कॅमिओ दाखवण्यात आला होता, मात्र तो सीन रजनीकांत यांनी स्वतः शूट केला नसल्याचे नंतर समोर आले होते. तसेच 'चेन्नई एक्सप्रेस'मधील 'लुंगी डान्स' गाण्यातूनही थलैवांना ट्रिब्यूट देण्यात आले होते. मात्र, आता दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या 'जेलर २'मध्ये हे दोन्ही स्टार्स खरोखरच एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

या चर्चेला निमित्त ठरली आहे अभिनेता मोहनलाल यांचे स्टायलिस्ट जिहाद शमसुद्दीन यांची एक इंस्टाग्राम स्टोरी. जिहाद यांनी एआय (AI) द्वारे तयार केलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये शाहरुख खान कार चालवताना दिसत असून त्यांच्यासोबत मोहनलाल, रजनीकांत आणि शिव राजकुमार बसलेले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये चाहत्यांना अशी फ्रेम 'जेलर २'मध्ये पाहायची आहे, असे लिहिले होते. हा फोटो रि-शेअर करताना जिहाद यांनी तमिळमध्ये 'कंदिप्पा इरुक्कुम' म्हणजेच 'हे नक्की घडणार' असे लिहिल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'जेलर'च्या पहिल्या भागात मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी 'मॅथ्यू' या भूमिकेत छोटा पण प्रभावी कॅमिओ केला होता. सीक्वेलमध्येही ते आपल्या भूमिकेत परतणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. जर शाहरुख खान या चित्रपटात सामील झाला, तर भारतीय सिनेमाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा कोलॅब ठरेल. शाहरुख आणि रजनीकांत अधिकृतपणे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील, ज्यामुळे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या वृत्ताबाबत अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, जो २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. तरीही 'जेलर २' मधील या संभाव्य कास्टिंगमुळे सोशल मीडियावर सध्या केवळ याच विषयाची चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Will Fans' Wait End? 'Thalaiva' and 'King Khan' to Appear Together?

Web Summary : Rumors suggest Rajinikanth and Shah Rukh Khan may star in 'Jailer 2'. A stylist's AI-generated photo fueled speculation. If confirmed, it would be a historic collaboration, potentially breaking box office records. Official confirmation is awaited.
टॅग्स :रजनीकांतशाहरुख खानबॉलिवूडTollywood