Join us

Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 13:56 IST

Shah Rukh Khan : सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. शाहरुखला धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल ट्रेस केला तेव्हा तो कॉल रायपूरवरून आल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांचं पथक रायपूरला गेलं असून पुढील तपास अद्याप सुरू आहे.

मुंबई पोलीस या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहेत. शाहरुख खानला ही धमकी देण्यामागचा हेतू शोधला जात आहे. मुंबई पोलिसांचं एक पथक रायपूरला गेलं आहे. तेथे हे पथक या प्रकरणाची चौकशी करेल. वांद्रे पोलीस ठाण्यात धमकीचा फोन आला होता. यानंतर एकच खळबळ उडाली.

धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटलं की, शाहरुख खानचा जीव वाचवायचा असेल तर आम्हाला कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जावं लागेल. त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. आरोपीने फोन बंद केला आहे. त्याचं नेमकं लोकेशन शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

धमकीच्या फोननंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत भीतीचं वातावरण आहे. शाहरुखने काही दिवसांपूर्वी सलमान खानचीही भेट घेतली होती आणि दोन्ही स्टार्स एकमेकांच्या घराजवळच राहतात. पोलिसांनी मन्नतच्या बाहेर बॅरिकेड्स लावले आहेत. या घटनेनंतर शाहरुख खानची सुरक्षाही वाढवली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :शाहरुख खानसलमान खानगुन्हेगारीमुंबई पोलीस